रत्नागिरी, दि. ०३ : सहकार क्षेत्रात सातत्याने भरीव व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मे. ई प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित को-ऑप. बँक्स टॉप १०० समिट २०२५ अंतर्गत “बेस्ट बँक ऑफ द इअर” तसेच “इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर” हे दोन प्रतिष्ठेचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तसेच शेतकरी व सामान्य जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत बँकेची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था न राहता जिल्ह्यातील तळागाळातील जनतेसाठी विश्वासाचे व आधाराचे केंद्र म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, लघुउद्योग व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक सातत्याने कृतीशील भूमिका बजावत आहे. जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळकटी देत बँकेच्या माध्यमातून एक नवे सहकार पर्व सुरू झाले असून, शहर व ग्रामीण भागातील ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
कृषी क्षेत्राला प्राधान्य देणे हा बँकेचा मुख्य उद्देश असून प्राथमिक शेती सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुलभ व पारदर्शक कर्जपुरवठा करण्यावर भर देण्यात येतो. सहकार क्षेत्रातील मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने प्राथमिक शेती संस्थांचे पदाधिकारी व सचिव यांना कर्जवाटप, कर्जवसुली, लेखापरीक्षण व आर्थिक शिस्त यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी बँक दरवर्षी बँकिंग विषयक कार्यशाळा व शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करते. यामुळे सहकारी संस्थांची कार्यक्षमता वाढून त्या अधिक सक्षम होत आहेत.
दि. ३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या आर्थिक स्थितीने लक्षणीय प्रगती दर्शविली आहे. बँकेच्या एकूण ठेवी ₹२,८६६.८७ कोटींवर पोहोचल्या असून कर्जवाटप ₹२,१९९.६४ कोटी इतके आहे. विशेष बाब म्हणजे बँकेने ₹५,००० कोटींच्या एकूण व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. आर्थिक शिस्त व काटेकोर नियोजनाचे फलित म्हणून बँकेला सलग १५ वर्षे ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला असून, सलग १३ वर्षे निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे. ही बाब सहकार बँकिंग क्षेत्रात बँकेची विश्वासार्हता अधोरेखित करणारी आहे.
बँकेच्या ठेवींमध्ये झालेली वाढ, कर्जवसुलीतील शंभर टक्के कार्यक्षमता तसेच नफ्यात झालेली सातत्यपूर्ण वाढ ही बँकेच्या कुशल व्यवस्थापनाची साक्ष आहे. या यशामागे बँकेचे सभासद, हितचिंतक, ठेवीदार व कर्जदार यांचा विश्वास तसेच कर्मचाऱ्यांची निष्ठा व परिश्रम यांचे मोठे योगदान आहे. बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे व मा. संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने सहकार क्षेत्रात आदर्शवत वाटचाल केली आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सहकार भूषण व सहकारनिष्ठ असे दोन मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून, आतापर्यंत एकूण १९ पुरस्कारांनी बँकेचा गौरव करण्यात आला आहे. हे पुरस्कार बँकेच्या कार्यक्षमतेसह सामाजिक बांधिलकीचेही प्रतीक मानले जात आहेत.
बँकेच्या जिल्ह्यात एकूण १९ एटीएम केंद्रे कार्यान्वित असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून डिजिटल बँकिंग सेवा अधिकाधिक विस्तारण्यात येत आहेत. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कोअर बँकिंग सोल्यूशन यांसारख्या सेवांमुळे ग्राहकांना जलद, सुरक्षित व सुलभ व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजिटल युगाशी सुसंगत राहून सहकार बँकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम बँक करीत आहे.
बँकेचे सहकार क्षेत्रातील नेतृत्वगुण, नावीन्यपूर्ण उपक्रम, अद्ययावत बँकिंग धोरणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा सखोल अभ्यास करून मे. ई प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया, नवी मुंबई यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन २०२५ साठी “बेस्ट बँक ऑफ द इअर” व “इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर” या पुरस्कारांसाठी निवड केली.
सदर पुरस्कार वितरण सोहळा दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी नोवोटेल हॉटेल, खोपोली येथे उत्साहात पार पडला. निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते बँकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. गोपाळ भगत (डेप्युटी सीईओ, इंडियन बँकिंग असोसिएशन), श्री. प्रमोद कर्नाड (माजी कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य बँक), श्री. अजय ब्रम्हेचा (अध्यक्ष, महाराष्ट्र को-ऑप. बँक फेडरेशन) उपस्थित होते. तसेच मा. सतीष मराठे (संचालक, सेंट्रल बोर्ड ऑफ बँक – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) व श्री. सुन्मेश जोशी (डेप्युटी डायरेक्टर जनरल, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, भारत सरकार) यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या सोहळ्याच्या निमित्ताने बँकिंग क्षेत्रात होत असलेले आमूलाग्र बदल, बदलत्या आर्थिक धोरणांचा परिणाम तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकांपुढे निर्माण होणारी नवी आव्हाने यावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. भविष्यात सहकारी बँकांनी ग्राहककेंद्री धोरणे स्वीकारून तंत्रज्ञानाशी जुळवून कसे पुढे जावे, याबाबत मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.
“बेस्ट बँक ऑफ द इअर” व “इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर” हे दोन्ही पुरस्कार मिळाल्याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. बँकेच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सभासद व ग्राहकांकडून मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत असून, बँकेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.