रत्नागिरी, दि. ०९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरीतर्फे ‘वही-पेन शैक्षणिक साहित्य’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
अभियानात जमा झालेल्या शैक्षणिक साहित्याद्वारे आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदत करण्याचा संस्थेचा हेतू आहे. समाजातील विविध स्तरातून मिळालेल्या प्रतिसादामुळे संस्थेचे अध्यक्ष चंद्रमणी सावंत तसेच पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमातून जमा झालेले साहित्य येत्या नवीन शैक्षणिक वर्षात, जून महिन्यात जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.








