पुणे, दि. १९ : ‘दैनिक रत्नभूमी’ वृत्तपत्राच्या मालक अॅड. श्रद्धा पालांडे–तारे आणि अॅड. उमेश बालाजी तारे यांच्या कन्या ऋजवी उमेश तारेचा पहिला वाढदिवस भव्य उत्सव न करता सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ऋजवीच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील स्नेहवन या एनजीओमधील शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी मोठा उपक्रम राबवण्यात आला. स्नेहवनमध्ये सध्या सुमारे ८० विद्यार्थी असून, त्यांच्या शिक्षण–पोषणाची जबाबदारी ही संस्था पार पाडते. ऋजवीच्या वाढदिवसानिमित्त भोजनदान तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्नेहवन या संस्थेने राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळवत महाराष्ट्रात विशेष कामगिरीची नोंद केली आहे.
तसेच, या वाढदिवसाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील जेवरी (ता. निलंगा) येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ मधील सर्व विद्यार्थ्यांना ऋजवीच्या काका श्री. गणेश बालाजी तारे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. यासोबतच शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक उपक्रमही राबवण्यात आला.
मुलीचा पहिला वाढदिवस कोणतेही दिखावे न करता, अनाथ व गरजू मुलांसाठी भोजनदान व शैक्षणिक मदत देत साजरा करून तारे परिवाराने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
अॅड. उमेश तारे हे पुणे जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्ट, नवी दिल्ली येथे प्रॅक्टिस करतात. वकिली व्यवसायासोबत ते अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. तर त्यांच्या पत्नी अॅड. श्रद्धा पालांडे–तारे या कोकणातून सर्वप्रथम दैनिक वृत्तपत्राचे युग सुरु करणाऱ्या वृत्तपत्र ‘दैनिक रत्नभूमी’ च्या मालक असून माध्यमक्षेत्र, वकिली व समाजकार्यातही उल्लेखनीय योगदान देत आहेत.









