टीम इंडिया ‘गंभीर’ संकटात ; दक्षिण आफ्रिकेडून भारताचा 408 धावांनी धुव्वा

93 वर्षांतला सर्वात भयानक पराभव, मालिकाही गमावली

गुवाहाटी, दि. २६ : गुवाहाटी कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारुण पराभव करत 93 वर्षांच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठी हार भारतीय संघाच्या झोळीत भरली. 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने लढण्याची कोणतीही क्षमता दाखवली नाही आणि फक्त 140 धावांवर सर्वबाद होत सामना 408 धावांनी गमावला. दोन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या आफ्रिकन संघाने भारताला 2-0 ने व्हाईटवॉश देत इतिहास रचला. 25 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेला भारतात कसोटी मालिका जिंकता आली असून, टेम्बा बावुमा हा हॅन्सी क्रोन्येनंतर भारतात मालिका जिंकणारा दुसरा आफ्रिकन कर्णधार ठरला. भारतीय संघाला यापूर्वी इतक्या मोठ्या फरकाने कसोटी सामना गमवावा लागला नव्हता. 2004 मध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 342 धावांनी झालेला पराभव हा सर्वात मोठा ठरला होता, पण गुवाहाटीतील 408 धावांचा धक्का सर्व विक्रम मोडून गेला.

या सामन्यात संपूर्णपणे दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत त्यांनी 489 धावांचा डोंगर उभा केला. सेनुरन मुथुसामीने केलेली 109 धावांची खेळी, तसेच मार्को जान्सनच्या 93 धावांनी भारतीय गोलंदाजांची अवस्था बिकट केली. भारताच्या पहिल्या डावात मार्को जान्सनने गोलंदाजीतही कमाल केली आणि सहा बळी घेत भारतीय फलंदाजीची वाट लावली. भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 201 धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावातही आफ्रिकन फलंदाजांनी आक्रमक खेळ कायम ठेवत 260/5 वर डाव घोषित केला आणि भारतासमोर जवळपास अशक्य असलेले 549 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शरमेपोटीही लढण्याची जिद्द दाखवली नाही. दुसऱ्या डावात सायमन हार्मरने 6 बळी घेत भारतीय फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले. एका सामन्यात त्याच्या एकूण 9 विकेट्स महत्वपूर्ण ठरल्या. भारतीय फलंदाजीतील कुठल्याही खेळाडूने स्थानिक मैदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. पाचव्या दिवशी टिकून सामना वाचवण्याची संधी असूनही संघ 63.5 षटकांत सर्वबाद झाला.

आता भारताच्या घरच्या मैदानावरील वर्चस्वालाही धक्का बसला आहे. 2012 नंतर कोणत्याही परदेशी संघाला भारतात कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. पण प्रथम न्यूझीलंडने 3-0 ने मालिका जिंकत भारताची सलग 12 वर्षांची विजयी मालिकाच संपवली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने पराभूत करत भारतीय क्रिकेट व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने गेल्या 14 महिन्यांत घरच्या मैदानावर पाच कसोटी सामने गमावले आहेत. या कालावधीत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून फलंदाज-गोलंदाज दोन्ही विभागात मोठ्या समस्या उघड झाल्या आहेत. स्वतःच्या खेळपट्ट्या, प्रेक्षकांचा पाठिंबा, फिरकीला अनुकूल वातावरण आणि अनुभवी खेळाडू असताना भारतीय संघाचा संघर्षच दिसला नाही.


या पराभवाचा एक मोठा फटका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत बसला आहे. भारत आता पाचव्या स्थानावर घसरला असून त्याचे फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न जवळपास अशक्य झालं आहे. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी असून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी गेले आहेत. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानलाही अप्रत्यक्ष लाभ झाला असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पुढे भारताला काही काळ टेस्ट सामने नाहीत, त्यामुळे गुणतालिकेतील स्थान इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा हा लाजिरवाणा काळ मानला जात आहे. चाहत्यांचा विश्वास डळमळीत झाला असून, प्रशिक्षक-व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या निवडीवर नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम जे संघ पूर्वी करू शकत नव्हते, ते आता सहज साध्य करत आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटला नव्याने उभं राहण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

आणखी वाचा