मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पाहणी दौऱ्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब व पृथ्वीक प्रताप यांची कडवईला भेट

संगमेश्वर, दि. १० (प्रतिनिधी): तालुक्यातील कडवई येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अभियानाच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सिनेनाट्य कलाकार शिवाली परब व पृथ्वीक प्रताप यांनी हजेरी लावली. संयुक्त राष्ट्रसंघाची जी सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी एकत्र येऊन शाश्वत विकासाची ध्येये निश्चित केली आहेत.त्यानुसार ग्लोबल वॉर्मिग,रोगराई,प्रदूषण यावर मात करण्यासाठी एकत्र येऊन शाश्वत विकासाची १७ ध्येये आणि ९ संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत.यांच्या आधारे गावचा शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट शासनाने संपूर्ण महाराष्ट्राभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले आहे.यामध्ये गरिबी निर्मूलन,बाळस्नेही गाव,आरोग्यदायी गाव,जलसमृद्ध गाव,स्वच्छ व हरित गाव, स्वयंपूर्ण गाव,सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव व महिलास्नेही गाव या संकल्पनांच्या आधारे शाश्वत विकास करण्याचे निश्चित केले.त्याला प्रतिसाद म्हणून कडवई गावाने या अभियानात सहभाग घेतला आहे.

कडवईत १७ सप्टेंबर २०२५ पासून हे अभियान सुरू झाल्याबरोबर गावात लोक सहभाग व श्रमदानातून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आल्या.यावेळी धर्म,जात,पंथ,पक्ष यांना बाजूला ठेवून गावातील लोकांनी एकत्र येऊन सोलर स्ट्रीट लाईट, वनराई बंधारे बांधणे,रस्ते बांधकाम, परिसर स्वच्छता,आरोग्यविषयक शिबिरे व प्लास्टिक मुक्ती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला.या उपक्रमांची पाहणी करून शुभेच्छा देण्यासाठी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राची हास्य जरा फेम शिवाली परब व पृथ्वीक प्रताप यांनी भेट दिली. या टीमच्या हस्ते ग्रामपंचायत येथील सोलर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.

या टीमचे स्वागत भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या लेझीम पथकाने केले.यावेळी दोन्ही कलाकारांनी हातात लेझीम घेत नृत्याचा आनंद घेतला व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.कडवई बाजारपेठ येथे सर्वांचे ग्रामपंचायत व गावच्यावतीने स्वागत करण्यात आले.यावेळी सपूर्ण अभियानाचा उद्देश थोडक्यात मांडण्याचे काम दी.इंग्लिश मिडीयम स्कूल कडवई व अंगणवाडी बाल कलाकार यांनी पथनाट्याद्वारे केला.त्यांना मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी दोन्ही कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य करत स्वच्छ व सुंदर गाव करण्याचा नारा दिला.

या कार्यक्रमाला रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील ,कॅफो सुर्वे, गट विकास अधिकारी अनंत लोकरे,सहाय्यक गट विकास अधिकारी विनोद कुमार शिंदे,संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण,सर्व विस्तार अधिकारी, सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजन कापडी, माजी सरपंच वसंत उजगावकर, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण,ग्रामविकास अधिकारी राहुलकुमार चौधरी, मिलिंद चव्हाण, विजय कुवळेकर, भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवईचे मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक रिदवान कारिगर, संस्थाध्यक्ष सादिक काझी, डॉ.अन्सार जुवळे, डॉ.भगवान नारकर,सर्व खात्यांचे प्रमुख व ग्राम पातळीवरील सर्व कर्मचारी, शाळा महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी, एनसीसी व स्काऊट गाईड पथक, गावचे सर्व मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

या अभियानाचा कालावधी ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविल्यामुळे अजूनही अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून राज्य पातळीवर पोहोचण्यात निर्धार ग्राम पंचायतीने केला आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले.

आणखी वाचा