संगमेश्वर, दि. ११ : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली तब्बल १७ वर्षे रखडले असून हे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी जन आक्रोश समितीच्या वतीने संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळ जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
रखडलेले काम त्वरित सुरू करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. सलग एक तास रस्ता रोको आंदोलन सुरू राहिल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी निलेश माईंनकर तसेच पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी उपस्थित राहून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ अधिकारी येऊन चर्चा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, तसेच वरिष्ठांना निवेदन देणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी ठामपणे मांडली. त्यामुळे बराच वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
अखेर उशिरा कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका जाधव घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जन आक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी त्यांना निवेदन दिले. यावेळी सविस्तर चर्चा होऊन मार्च अखेरपर्यंत संबंधित काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात दापोली, पोलादपूर, महाड, माणगाव, खेड, मंडणगड तसेच संगमेश्वर तालुक्यातील स्थानिक नागरिक मिळून सुमारे २०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.








