संगमेश्वर, दि. १८ : तालुक्यातील सोनवडे बौद्धवाडी येथे रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ध्वजस्तंभावर अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात शनिवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच बौद्धवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कडक बंदोबस्त तैनात केला.
मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ देवरुख पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून रात्रभर पहारा ठेवण्यात आला होता.

घटनेचा छडा लावण्यासाठी शनिवारी सकाळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संशयिताचा माग काढण्यासाठी परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बाजीराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम तसेच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दिवसभर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलीस निरीक्षक उदय झावरे हे राखीव सुरक्षा दलासह परिसरात तैनात होते. सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही पुन्हा घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.
दरम्यान, आमदार शेखर निकम यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती ग्रामस्थांनी दाखवलेल्या संयमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वजस्तंभाची तोडफोड करणाऱ्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ध्वजस्तंभ पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परिसरात सध्या शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.








