संगमेश्वर, दि. ०१ (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी स्मारकाच्या रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकारवर टीका करत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य व दिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. स्मारक उभारणीबाबत केवळ घोषणा करण्यात आल्या असून प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री फक्त घोषणा करत आहेत, मात्र त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत दिलेला शब्द शासनाने पाळावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आजही ते स्मारक प्रत्यक्षात दिसून येत नाही. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी या परिसराला भेटी दिल्या, परंतु ज्या प्रमाणे इतर भागांत विकासकामे झाली, त्या प्रमाणे कसबा परिसरात कोणताही विकास झालेला नाही, ही बाब दुर्दैवी आहे.
स्मारकासाठी निधीची अडचण नसून केवळ राजकीय इच्छाशक्तीचीच अडचण आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या माध्यमातून या भागाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास होऊ शकतो. मात्र शासनाकडून उदासीनता दाखवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काशीनाथ वाझे, फैज पाटणकर, मुरलीधर बोरसुतकर, इलियाज मापारी, अशोक पवार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली.








