मुंबईत “संविधान सन्मान महासभे”ला आज लोटणार जनसागर

वंचित बहुजन आघाडीची जय्यत तयारी पूर्ण

मुंबई, दि. २५ (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज, २५ नोव्हेंबर रोजी भव्य ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले असून या ऐतिहासिक सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित या महासभेला व्यापक प्रतिसाद मिळत असून संविधानवादी जनता मोठ्या संख्येने सभास्थळी उपस्थित राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

१९४९ साली संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले शेवटचे भाषण हा भारतीय प्रजासत्ताकाचा मार्गदर्शक दस्तावेज मानला जातो. धर्माला राष्ट्रावर प्राधान्य दिल्यास निर्माण होणारे धोके, लोकशाहीचा पाया असणारी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची गरज आणि सामाजिक लोकशाहीची अनिवार्यता या त्यांच्या विचारांना जनमानसात पुन्हा दृढ करण्याच्या हेतूने ही सभा आज संध्याकाळी चार वाजता दादरच्या शिवाजी पार्क येथे भरत आहे.

या सभेत सामाजिक न्याय, लोकशाही मूल्यांचे रक्षण, संविधान संरक्षण, धर्मनिरपेक्षता आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा होणार असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन हे या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. देशभरातून आलेले विविध मान्यवर, लोकशाहीवादी विचारवंत, फुले–शाहू–आंबेडकरी तत्वांचे अनुयायी तसेच मानवतावादी नागरिक या महासभेत सहभागी होणार असल्यामुळे वातावरणात उत्साह ओसंडून वाहत आहे.

सभेच्या तयारीचा आढावा युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोमवारी शिवाजी पार्क येथे भेट देऊन घेतला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना देशभरातून संविधानवादी जनता मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत असल्याची माहिती दिली. त्यांच्या सोबत सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, कमलेश उबाळे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्साहाने तयारीत गुंतलेले असून बॅनर, पोस्टर्स आणि स्वागत फलकांनी मुंबईतील प्रमुख चौक सजले आहेत.

वंचित बहुजन आघाडीनं दरवर्षी अशी संविधान सन्मान सभा आयोजित करण्याचा संकल्प केला असून सभेच्या तारखेबाबतही विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण भाषणाचे स्मरण आणि त्यातील संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच ही सभा २५ नोव्हेंबरला आयोजित केली जात असल्याचे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

सभा यशस्वी व्हावी आणि उपस्थितांच्या सोयीसाठी अतिरिक्त आर्थिक बोजा टाळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीनं राज्य शासनाकडे टोलमाफीची मागणीही केली आहे. सोमाटणे, उर्से, वर्सोली यांसारख्या महत्त्वाच्या टोल नाक्यांवर पूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून यामुळे राज्यभरातून येणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सभेच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाही निमंत्रण दिले जात आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश महासचिव रामकला मगर यांनी हास्यकलाकार आणि अभिनेता गौरव मोरे यांना वैयक्तिक भेट देत सभेचे आमंत्रण प्रदान केले. संवादादरम्यान संविधान मूल्यांचे जतन, सामाजिक समता आणि सांस्कृतिक जागरूकतेबाबत आवश्यक संवादाची गरज व्यक्त करण्यात आली. गौरव मोरे यांनी या सन्माननीय निमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मुंबईत पोस्टर्स आणि बॅनर्समुळेही सभेची चर्चा रंगली आहे. “आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानेच चालेल, मनुस्मृतीने नाही” असा ठळक संदेश असलेला बॅनर दादरमधील राजगृहाजवळ लावण्यात आल्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधले आहे. संविधान आणि मनुस्मृती यातील भेद स्पष्ट दाखवणाऱ्या या पोस्टर्समुळे संविधानरक्षणाचा संदेश अधिक तीव्रतेने लोकांपर्यंत पोहोचत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह इतका अनोखा दिसतो की गोवंडीतील एका विवाह सोहळ्यातही नवदाम्पत्याच्या वतीने संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण पाहुण्यांना देण्यात आले. तर कोकणातूनही मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मुंबईत दाखल होण्यास सज्ज आहेत.

लोकशाही, संविधान मूल्ये आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर नवा संदेश देणारी ही सभा आज शिवाजी पार्कात दणदणाटी वातावरणात पार पडणार असून लाखोंच्या उपस्थितीची तयारी करण्यात आली आहे. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या महासभेतून देशात लोकशाही रक्षणाचा संदेश पुन्हा एकदा बुलंद होणार आहे.

आणखी वाचा