‘सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे मला माहीत नव्हते’; शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणावर मोठा खुलासा

बारामती, दि. ३१ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून पुढे आली होती. अखेर सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी कोणतीही चर्चा झाली नाही. आज शपथविधी आहे, हे देखील मला माहीत नव्हते. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पवार कुटुंबातील अंतर्गत संवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा न करता थेट मुंबईला गेल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच उपमुख्यमंत्री पदाबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. रात्री उशिरा सुनेत्रा पवार या त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यासह मुंबईतील बंगल्यावर दाखल झाल्या. त्याचवेळी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचालीही सुरू झाल्याचे बोलले जात असून, यासाठी भाजपकडून सकारात्मक भूमिका असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आणखी स्पष्ट करत सांगितले की, “प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काय निर्णय घ्यावा, हे त्या पक्षाचे नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही.” अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात असून, या घटनेनंतर पक्षात सुरू असलेल्या हालचालींबाबत मला माहिती देण्यात आली नाही, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरही महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले की, “गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर सकारात्मक चर्चा सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांकडून या विषयावर सातत्याने संवाद सुरू होता. विलीनीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. येत्या १२ तारखेला हा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला जाणार होता.” मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर आणि सध्याच्या घडामोडींमुळे या प्रक्रियेला खंड पडल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

https://www.facebook.com/watch/?v=881547794798665

या संपूर्ण प्रकरणामुळे पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवार गटाशी शपथविधीबाबत कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.

शुक्रवारी बारामती येथे अजित पवार यांच्या अस्थी विसर्जनाचा विधी पार पडला. या विधीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र उपस्थित होत्या. मात्र, विधी संपल्यानंतर दोघी वेगवेगळ्या दिशेने गेल्या. त्यानंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले.

या काळात सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कोणतीही भेट झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संवादाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्याशी थेट संवाद साधला नसल्याने कुटुंबातील मतभेद उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकांतून सावरत असतानाच सुरू झालेल्या या राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया ही केवळ कौटुंबिक नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय दिशेबाबत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

आणखी वाचा