रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये शिक्षक परिषदेची बैठक

चिपळूण, दि. १८ (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग ,रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे सोमवारी झालेल्या बैठकीत आमदार निरंजन डावखरे यांची हॅट्रिक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

चिपळूण येथे झालेल्या आढावा बैठकीला सुमारे ९०० हून अधिक शिक्षकांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच माजी आमदार सूर्यकांत दळवी , विनय नातू, बाळ माने. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्याध्यक्ष एकनाथ दळवी, कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, कोषाध्यक्ष पी. एम. पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र इनामदार, देवराज राहुल, ज्ञानेश्वर शिंदे ,विजय दरेकर, विजय भामरे, दिलीप उभारे, अनिल पाटील, भरत केसरकर, राठोड सर, जीवन पाटील, अनंत शेलार, विजय मस्के, नंदन घोगळे, सुनील गौंड, श्री. पाचकुडे, श्री. बसवंत उपस्थित होते.

भाजपा व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकांमध्ये परिषदेच्या सदस्यांकडून सहकार्य केले जाते. त्याचपद्धतीने या निवडणुकीतही प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन जास्तीत जास्त मतदान होण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. तसेच मतदानप्रक्रियेविषयी माहिती देऊन, निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन पहिल्या फेरीतच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू म्हणाले, “शिक्षण आणि शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. संच मान्यतेचा शासन निर्णय हा ग्रामीण व शहरी भागासाठी सारखाच आहे. त्याच्यातील निकष बदलायला हवेत. विद्यार्थी पटसंख्या कमी करायला हवी, नाहीतर अनेक शिक्षक अतिरिक्त होतील. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नेहमी भाजपाबरोबर असून, आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असते. या वेळेसही कोकणातील पाचही जिल्ह्यात परिषदेचे कार्यकर्ते काम करत आहेत.”

परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर अमित आदवडे यांनी सूत्रसंचालन व लक्ष्मण बालगुडे यांनी आभार मानले.

आणखी वाचा