सिंधुदुर्गात ‘राणे विरुद्ध राणे’ संघर्ष तीव्र — तळकोकणातील राजकारणात धुमशान

सिंधुदुर्ग, दि. २८ : तळकोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ज्वर दिवसेंदिवस वाढत असून, राजकीय वातावरण अक्षरशः धगधगत आहे. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप — हे दोन्ही निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरल्याने वातावरणात अनिश्चितता, तणाव आणि स्पर्धेची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ‘राणे विरुद्ध राणे’ अशी थेट घरातीलच राजकीय लढत रंगू लागल्याने तळकोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या संघर्षाची सुरुवात मालवणमध्ये झालेल्या एका घटनेपासून झाली. आमदार नीलेश राणे यांनी पोलिसांसह भाजप कार्यकर्ते विजय किनवडेकर यांच्या घरावर धाड टाकत घरात ठेवलेले लाखो रुपये निवडणुकीतील वाटपासाठी असल्याचा गंभीर आरोप केला. या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. अचानक अनधिकृतरीत्या झालेल्या तपासणीमुळे स्थानिक पातळीवरील राजकारण तापले आणि नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली.

या नाट्याला दुसऱ्याच दिवशी नवीन कलाटणी मिळाली. कोकणातील प्रभावी नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी थेट किनवडेकर यांच्या घरी भेट देत त्यांना धीर दिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नीलेश राणेंच्या आरोपांना राजकीय कोटी ठरवत जोरदार पलटवार केला. नितेश म्हणाले,
“प्रत्येकाचा व्यवसाय असतो. व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. नियम जर आम्हाला लागतो, तर तो सर्वांनाच लागू झाला पाहिजे. ‘हमाम में सब नंगे हैं’ हीच वस्तुस्थिती आहे.”

नीलेश यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख करत त्यांच्या भेटीनंतरच पैसा आला असल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना नितेश म्हणाले,
“प्रदेशाध्यक्ष म्हणून चव्हाण यांना सर्वत्र फिरावं लागतंच. तसेच आम्हाला उदय सामंत का आले होते असा प्रश्न विचारला तर? राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत.”

महायुतीबाबत बोलताना नितेश यांनी स्पष्ट केले की,
“एकत्र निवडणूक लढण्याबाबत चर्चा करण्याची वेळ निघून गेली. आता सर्वच जण प्रचारात मग्न आहेत. जे होणार ते मैदानात ठरेल.”

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नीलेश राणे मात्र ठाम राहिले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन जप्त झालेल्या रकमेबाबत चौकशीची मागणी केली.
“हा पैसा कुठून आला? त्याबाबत पुरावे द्यावेच लागतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कार्यकर्ते विजय किनवडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले,
“हे पैसे माझ्या बांधकाम व्यवसायातील आहेत. मित्रांकडून घेतलेले असून सर्व पुरावे मी देईन. निवडणुकीत काम करणारच. परंतु माझ्या घरात अनधिकृतरित्या घुसलेल्या लोकांवर मी कायदेशीर कारवाई करणार.”

या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी शिवसेना (उबाठा) सुद्धा मैदानात उतरली. माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर जोरदार टीका करत सांगितले,
“मताला दहा हजार मिळतात म्हणून दोन फोन आले. दोन्ही पक्षांत पैशांचा पाऊस सुरू आहे. मालवणमध्ये जी घटना घडली ती त्याचाच पुरावा आहे.”

सिंधुदुर्गातील हे राजकीय युद्ध आता फक्त भाजप-शिवसेना इतकेच मर्यादित राहत नाही, तर ते राणे कुटुंबातील थेट राजकीय संघर्षात परिवर्तित होत आहे. निवडणुकीच्या उंबरठ्यावर दोन्ही भावांचे विरुद्ध दिशेने उभे ठाकणे, एकाकडून आरोप आणि दुसऱ्याकडून प्रत्युत्तरांची मालिका — यामुळे तळकोकणातील राजकीय रंगमंच अतिशय तापलेला आहे.

निवडणुका जवळ येत आहेत; पैशांच्या वापराचे आरोप वाढत आहेत; आणि ‘राणे विरुद्ध राणे’ या नाट्यामुळे सिंधुदुर्गातील निवडणूक आणखीच रोमहर्षक बनली आहे.

आणखी वाचा