मुंबई, दि. १ फेब्रुवारी : “कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष, दादांनी दिलेला विचार घेऊनच पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका आहे आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत,” असे स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आज अस्थी कलश पूजनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला आहे. दादांच्या परवानगीशिवाय मी कोणतीही गोष्ट केलेली नाही. आमचा निर्णय दादांच्या विचारांशी आणि त्यांनी उभा केलेल्या पक्ष परिवाराशी सुसंगत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. काल सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावर कोणीही मत व्यक्त करू शकतो. मात्र महाराष्ट्राला सावरण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचे ‘विकसित महाराष्ट्र’ हे स्वप्न दृढ करण्यासाठी त्यांनी शपथ घेतली असून त्यात गैर वाटण्यासारखे काहीही नाही, असा टोलाही सुनील तटकरे यांनी विरोधकांना लगावला.
राज्यसभेचा उमेदवार कोण असावा हा आमच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याचे स्पष्ट करताना तटकरे म्हणाले की, भाजपने नेहमीच आम्हाला सहकार्य केले आहे. मंत्रिमंडळ रचना असो वा अन्य निर्णय, भाजपने मित्र पक्षाला सन्मानाने वागवले आहे. एनडीएमध्ये भाजपच्या शीर्ष नेतृत्वाखाली आम्हाला सौहार्दपूर्ण वातावरणाचा अनुभव येत आहे.
पक्ष विलीनीकरणाची चर्चा अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच का आणि कशासाठी सुरू झाली, असा सवालही त्यांनी माध्यमांना केला. दादांनी कष्टाने उभा केलेला विधीमंडळ पक्ष आहे. गेल्या वर्षभरात विलीनीकरणाबाबत विचारणा झाली असताना आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा सामूहिक निर्णय घेतला. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी ठाम राहून आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. महाराष्ट्रातील जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केले असल्याने हा निर्णय कायम राहील, असेही तटकरे यांनी ठामपणे सांगितले.
आम्ही विलीनीकरणाचा विषय बोललो नाही, उलट आमचा त्याला विरोध असल्याचे चुकीच्या पद्धतीने पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेली ३० वर्षे दादांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करत असल्याचे सांगत त्यांनी, पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडल्याचे नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्राचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचा अस्थी कलश पक्षाच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आला. सुनील तटकरे यांच्या हस्ते विधीपूर्वक त्याचे पूजन करण्यात आले. आजपासून हा अस्थी कलश राज्यातील सर्व जिल्ह्यांत नेण्यात येणार असून उद्या मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी दर्शनाचे आयोजन करतील. त्यानंतर संबंधित जिल्ह्यातील नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.
यावेळी युवा नेते पार्थ पवार पक्ष कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन दादा बसत असलेल्या खुर्चीला मिठी मारली. त्या क्षणी त्यांना अश्रू अनावर झाले. हुंदके देत पार्थ पवार यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही दर्शन घेतले.
पक्ष कार्यालयातून अस्थी कलश जिल्ह्यांकडे नेताना अनेक पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. हा प्रसंग अत्यंत भावूक वातावरणात पार पडला.
या वेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सना मलिक शेख, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, सुरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








