उद्योगमंत्री ना. उदय सामंतांवर सुषमा अंधारे यांचा तिखट प्रहार, “प्रिय उदयभाऊ”…उपमुख्यमंत्री व्हा आणि आम्हालाही बोलवा!”

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे या आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या असा दावा केला आहे. याला आता अंधारे यांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्यातील तणाव आता सोशल मीडियावर उफाळून आला आहे. उदय सामंत यांनी सुषमा अंधारे या भाजप-शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. तसेच अंधारे यांनी खासदार नरेश म्हस्के यांची दिल्लीमध्ये भेट घेतली असल्याचेही त्यांनी म्हटलं. या आरोपाला आता अंधारे यांनी थेट फेसबुक पोस्टमध्ये प्रत्युत्तर देत सामंतांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सामंतांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, त्यांच्या महत्वाकांक्षेवर टोलाच टोल काढला आहे. “प्रिय उदयभाऊ, आज तुम्ही जाहीरपणे मान्य केले की तुम्हाला प्रथम ठाकरेंनी महत्व दिले, त्यानंतर राष्ट्रवादीने तुम्हाला धुरंधर राजकारणी म्हणून उभं केलं, आणि मग तुम्ही शिवसेनेत जाऊन मुत्सद्दी नेता आहात हे सिद्ध केलं,” असा उल्लेख त्यांनी केला. याचबरोबर, आपण केवळ सत्तेसाठी कोणत्याही पक्षासोबत जाण्यास तयार असणारे राजकारणी आहात, असे तीव्र शब्दांत अंधारे यांनी म्हटले.

तसेच आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अंधारे यांनी असा दावा केला की, सामंत यांची “उपमुख्यमंत्री होण्याची सुप्त महत्वाकांक्षा” त्यांनी उघड केली आणि त्यामुळे त्यांच्या मनात रुष्टता निर्माण झाली. “तुमचे मनसुबे मी उधळल्यासारखे झाले का? माझ्यामुळे तुमच्या सुप्त इच्छा जगाजाहीर झाल्या का?” असा थेट प्रश्नही अंधारे यांनी विचारला. यासोबतच त्या म्हणाल्या की, कदाचित त्याच संतापातून सामंत यांनी त्यांच्या दिल्लीतील भेटीचा राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.

नरेश म्हस्के यांच्याशी झालेल्या भेटीबाबत अंधारे यांनी स्पष्ट केले की, ती पूर्वनियोजित भेट नव्हती. “दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात चहा पिताना ही भेट झाली. माझ्यासोबत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते, बाजूलाच अन्य खा. भगरे गुरुजी होते, आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकारही उपस्थित होते. यानंतर मी तत्काळ ही माहिती पक्षप्रमुखांना दिली,” असे सांगत अंधारे यांनी आरोप फेटाळले.

अंधारे यांनी सामंतांवर आणखी आरोप करताना असा दावाही केला की, उदय सामंत पुन्हा पक्ष फुटण्याच्या तयारीत आहेत. “तुम्ही आता तिथूनही फुटायला निघालात. आणि याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवल्याने तुम्ही कळवळलात,” असे म्हणत त्यांनी सामंत यांना थेट इशारा दिला. त्यांच्या शेवटच्या ओळीत त्यांनी उपरोधात्मक अंदाजात सामंतांना शुभेच्छा देत लिहिले, “तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला आम्हालाही बोलवा बरं का…”

सुषमा अंधारे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या नव्या फेरीत खासदार नरेश म्हस्के यांच्या ‘भेटी’पासून सुरू झालेला वाद आता थेट उपमुख्यमंत्री पदावर येऊन थांबला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेतील अंतर्गत हालचाली पुन्हा एकदा चर्चेत येत असून, या पोस्टचे राजकीय परिणाम काय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट LINK
https://www.facebook.com/share/p/1D66VQsM3z/

आणखी वाचा