मुंबई, दि. २५: आयसीसीने आज २०२६ च्या टी-२० क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले असून या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे मोठ्या जल्लोषात सुरुवात होणार आहे. यावेळी विश्वचषकाचा इतिहास बदलणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच तब्बल २० संघ या स्पर्धेत उतरतील. त्यामुळे स्पर्धेची व्याप्ती वाढून हा टी-२० विश्वचषक आतापर्यंतचा सर्वात मोठा ठरणार आहे. भारतातील चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली ही पाच प्रमुख क्रिकेट नगरे स्पर्धेचे आयोजन करणार असून श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडी येथे देखील सामने खेळवले जाणार आहेत.
२० संघांच्या सहभागामुळे स्पर्धेत चार गट तयार करण्यात येणार असून प्रत्येक गटात पाच संघ असतील. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नामिबिया, युएसए, नेदरलँड, इटली, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, कॅनडा, ओमान आणि आयर्लंड असे २० संघ या विश्वविक्रमी स्वरूपाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या सर्व संघांमध्ये सर्वाधिक उत्सुकता भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आहे. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तुफान लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्या दिवशी चाहत्यांच्या उत्कंठेचा कळस गाठला जाणार हे निश्चित आहे.
भारताचा प्रवास या स्पर्धेत ७ फेब्रुवारीला मुंबईत युएसएविरुद्धच्या सामन्यापासून सुरू होईल. त्यानंतर १२ फेब्रुवारीला दिल्ली येथे नामिबियाविरुद्ध सामना रंगेल. पाकिस्तानविरुद्धचा बहुप्रतिक्षित सामना १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे आयोजित करण्यात आला असून १८ फेब्रुवारीला भारत अहमदाबाद येथे नेदरलंडशी ताकद आजमावणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढे सुपर-८ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर पुन्हा चार गटांमध्ये विभागणी करण्यात येईल आणि प्रत्येक सुपर-८ गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. ८ मार्च २०२६ रोजी अंतिम सामना खेळवला जाणार असून याच दिवशी २०२६ चा टी-२० विश्वविजेता निश्चित होईल.
या स्पर्धेबद्दल भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा अत्यंत भावूक होत बोलला. तो म्हणाला की, “इतक्या देशांना टी-२० विश्वचषकात खेळताना पाहणे आनंददायी आहे. क्रिकेट जगभर विस्तारत असल्याचे हे संकेत आहेत.” तर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “आम्ही ही स्पर्धा जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहोत. चांगल्या खेळाचे वचन देतो.” याच पत्रकार परिषदेत क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली. आगामी टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून रोहित शर्मा यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी केली. कार्यक्रमाला भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, श्रीलंका क्रिकेटचे पदाधिकारी तसेच आयसीसीचे अधिकारी उपस्थित होते.
जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या नजरा आता फेब्रुवारी २०२६ कडे खिळल्या आहेत. विशाल स्वरूपाचा हा पहिलाच विश्वचषक, वाढती स्पर्धा, भारत-पाकिस्तानचे चिरंतन वैर, आणि यावेळी नव्या देशांचे पदार्पण — या सर्व गोष्टींमुळे टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२६ हा क्रिकेट जगतातील एक अविस्मरणीय सोहळा ठरणार हे निश्चित आहे.








