रत्नागिरी, दि. १८ (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात देखील आता इच्छुक उमेदवार दंड थोपटू लागले आहेत. रत्नागिरीतील शिवसेना ज्यांनी गावोगावी जाऊन रुजवली त्यापैकी एक नाव म्हणजे उदय बने.
उद्या दिनांक १९ जुन रोजी शिवसेना या पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन आहे, त्यापैकी ४५ वर्ष एकाच झेंड्याखाली मा. हिंदुहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन कडवट शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. रत्नागिरीत देखील आता अशाच निष्ठावंत शिवसैनिकाची गरज आहे गद्दारांना गाडण्यासाठी, मैत्रीपूर्ण संबंध बाजूला ठेवून भिडणारा असा हा कार्यकर्ता उमेदवार म्हणून प्रत्येक गावागावातील शिवसैनिकांना हवा आहे. त्यासाठी अनेक निष्ठावंत शिवसैनिक, मुस्लिम बांधव उदय बने यांची रोज भेट घेत आहेत. या सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री बने आगामी विधानसभा लढवण्यासाठी तयार झाले आहेत.
श्री.उदय बने यांचे मुस्लिम बांधवासोबत असो वा कुणबी समाजातील असो अशा सर्वच समाजबांधवांसोबत जिवाभावाचे सहृदय संबंध आहेत. गेली ३० वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम केलेले आहे. देशभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे देशव्यापी संघटन उभे करण्यात सिंहाचा वाटा आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकिने मांडले आहेत. असा सर्वमान्य उमेदवार असावा असे प्रत्येक रत्नागिरीकरांची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन तीन दिवसात अनेक कार्यकर्त्यांनी उदय बने यांची भेट घेतली घेतली असून यात रत्नागिरीतील काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांचा समावेश असून आम्हाला बदल घडवायचा असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गाव, वाडी, वस्तीवर चांगला जनसंपर्क असल्याने कोणत्याही जि. प. गटात निवडून येण्याची क्षमता त्यांच्यात आहे. विद्यमान आमदार यांना तेच शह देऊ शकतात असा ठाम विश्वास कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. त्यामुळे बनेनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.








