लांजा, दि. १६ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या मान्यतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पक्षासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सातत्याने आणि निष्ठापूर्वक काम करणारे दाजी पितांबर गडहिरे यांची लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गडहिरे यांनी अनेक वर्षे सक्रियपणे काम केले आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत प्रातिनिधिक नेते बबन कनावजे, जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने आणि ज्येष्ठ नेते मंहमदशेठ रखांगी यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दाजी गडहिरे यांनी पक्षातील सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संघटनवाढ आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की पक्षाच्या तत्त्वज्ञानानुसार कार्य करत लांजा तालुक्यात राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार गट अधिक बळकट करण्यासाठी ते पूर्ण क्षमतेने काम करतील.








