देवरुख नगरपंचायत निवडणूक : गाव विकास समिती–आप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दीक्षा खंडागळे यांचा अर्ज दाखल

देवरुख,दि. १६ : देवरुख नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असताना गाव विकास समिती व आम आदमी पार्टी यांच्या युतीने आज राजकीय वातावरणात नवे समीकरण निर्माण केले आहे. या युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. दीक्षा खंडागळे यांनी शनिवारी मोठ्या ताकदीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

दीक्षा खंडागळे यांनी युतीतर्फे आम आदमी पार्टीच्या ‘झाडू’ या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. गाव विकास समिती आणि ‘आप’ या दोन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्याने निवडणुकीत नवे समीकरण तयार झाले आहे. अनेक वर्षांपासून नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही घटकांनी यंदाच्या निवडणुकीत प्रथमच हातमिळवणी केल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

अर्ज दाखल करताना गाव विकास समिती व ‘आप’चे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात डॉ. मंगेश कांगणे (गाव विकास समितीचे सरचिटणीस व निवडणूक प्रभारी), अॅडव्होकेट सुनील खंडागळे, सुरेंद्र काबदुले (सरचिटणीस), नितीन गोताड, डॉ. रवींद्र जाधव (आप जिल्हाध्यक्ष), सचिन आपिष्टे (तालुका अध्यक्ष), महेंद्र घुग सर आदींचा समावेश होता. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी युतीला पूर्ण पाठिंबा देत आगामी निवडणुकीत दीक्षा खंडागळे यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अर्ज दाखल करताना परिसरात कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणाबाजी आणि उमेदवाराभोवतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या उमेदवारीनंतर गाव विकास समिती–आप युतीची निवडणूक मोहीम जोरदार वेग घेणार असून नगराध्यक्षपदाच्या लढतीत ही एन्ट्री महत्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आणखी वाचा