रत्नागिरीत प्रहारची दमदार एन्ट्री; रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत ३ उमेदवार रिंगणात

बच्चू कडूंच्या नेतृत्वात निवडणूक लढत रंगतदार

रत्नागिरी, दि. १८ : रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 जवळ येत असताना प्रहार जनशक्ती पक्षाने शहरात प्रभावी शक्तिप्रदर्शन करत अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे. लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने तीन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करून स्पर्धेत उतरवले असून, या हालचालीमुळे शहरातील राजकीय वातावरणात एक नवीन समीकरण तयार होत आहे.

प्रभाग 2 (अ) मधून सोनाली महादेव केसरकर, प्रभाग 2 (ब) मधून योगेश यशवंत हळदवणेकर, तर प्रभाग 8 (अ) मधून स्नेहा शिवराम ठीक यांनी अर्ज भरले. अर्ज दाखल करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे कोकण तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कोकण विभागाध्यक्ष सौ. काजल परेश नाईक, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष गुरुनाथ सुर्वे, कार्यकारी अध्यक्ष आदेश खाडे, महिला जिल्हाध्यक्ष आरती सुर्वे, संपर्कप्रमुख शैलेश पोस्तुरे तसेच रायगड जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी प्रभारी सचिन साळुंखे यांच्या उपस्थितीने वातावरण रंगतदार झाले.

शहरातील मूलभूत समस्यांकडे पारंपरिक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रहारने “प्रत्यक्ष काम, जनतेचा आवाज आणि संघर्षाची तयारी” या भूमिकेवर भर दिल्याचा दावा पक्षाने केला आहे.

“बदलासाठीची लढाई” असा निर्धार करत प्रहारचे उमेदवार आता जनतेसमोर सरळ उभे ठाकले आहेत. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत प्रहारची एन्ट्री शहरातील राजकीय परिस्थिति बदलवू शकते, अशी चर्चा रत्नागिरीत जोर धरू लागली आहे.

आणखी वाचा