गुहागर, दि. १८ : कोकणातील गुहागर नगरपंचायत निवडणुकीत यंदा अनपेक्षित आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळत असून वडील—मुलगा थेट आमनेसामने उभे ठाकल्याने ही निवडणूक उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचली आहे. राजकीय मतभेदांमुळे कौटुंबिक नाती कशी विविध रंग दाखवतात याचं उत्तम उदाहरण गुहागरमध्ये समोर आलं आहे.
स्थानिक वार्ड क्रमांक १३ मध्ये शिवसेना (शिंदे गट) तर्फे राजेंद्र अर्जुन भागडे नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचेच चिरंजीव सौरभ राजेंद्र भागडे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसह रिंगणात उतरले आहेत. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वार्डमध्ये उत्सुकता, चर्चा आणि राजकीय तापमान उसळले आहे.
कोकणातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय समीकरणांमध्ये यंदा ताण, तणाव आणि अनपेक्षित घडामोडी दिसून येत आहेत. राज्यात सत्ता सोबतीने असली तरी अनेक नगरपंचायतींमध्ये महायुतीचेच उमेदवार एकमेकांसमोर उभे राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुहागरमधील बापलेकांचा सामना ही त्याची ठळक झलक मानली जात आहे.
२१ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून तोपर्यंत या वार्डकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. भागडे पिता-पुत्रांची रंगणारी ही लढत गुहागरमध्ये चर्चेचा आणि राजकीय कुतूहलाचा सर्वात मोठा विषय ठरली असून अंतिम निकालापूर्वीच या निवडणुकीने रंगत वाढवली आहे.








