दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस विमान कोसळले; पायलट वीरमरण

नवी दिल्ली, दि. २१ : दुबई एअर शो २०२५ मध्ये भारतीय हवाई दलाची प्रतिष्ठा असलेले तेजस लढाऊ विमान प्रदर्शनादरम्यान कोसळल्याने हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. दुबईतील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू असलेल्या एअर शोच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारच्या सत्रात हे दुर्दैवी अपघात घडले. भारतीय हवाई दलाने अधिकृत माहिती देत या दुर्घटनेची पुष्टी केली असून या दुर्घटनेत तेजसचे पायलट वीरमरण पावल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

स्थानिक वेळेनुसार दुपारी अंदाजे २:१० वाजता तेजस विमानाने उड्डाणप्रात्यक्षिकासाठी टेक ऑफ घेतल्यावर काही क्षणातच ते खाली कोसळले. हवाई प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी उपस्थित होती. प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरच विमान कोसळल्यामुळे क्षणभरासाठी भीषण स्थिती निर्माण झाली. ‘खलीज टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार टेक ऑफनंतर लगेचच विमान जमिनीवर जोरदार आवाजासह आदळले आणि त्यानंतर घनदाट काळ्या धुराचे लोट हवेत उंचावले. परिसरात तत्काळ सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि हेलिकॉप्टर पोहोचले. घटनास्थळ तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले, तर एअर शो तात्पुरता थांबवण्यात आला. प्रेक्षकांना प्रदर्शन क्षेत्रातून मागे नेण्यात आले असल्याचे ‘गल्फ न्यूज’ने वृत्त दिले आहे.

या दुर्घटनेविषयी भारतीय हवाई दलाने दिलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, “दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान आयएएफचे तेजस विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानाचे पायलट गंभीर जखमी झाले होते आणि त्यांनी वीरमरण पत्करले. भारतीय हवाई दलाला झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख आहे. या दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत.” हवाई दलाने या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास न्यायालय स्थापन करण्याचीही घोषणा केली आहे.

भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित तेजस फायटर जेटने अनेक देशांत आपला वेध घेतला आहे. अत्याधुनिक, हलके व बहुपयोगी युद्धविमान म्हणून तेजस जगभरात ओळखले जाते. दुबई एअर शोमध्ये त्याचे प्रदर्शन भारतीय संरक्षणशक्तीचे प्रतीक म्हणून मोलाचे ठरत होते. मात्र, या दुर्घटनेमुळे भारताच्या हवाई सामर्थ्यासोबत एका वीर वैमानिकाचे बलिदान देशाला चटका लावून गेले आहे. दुबईत घडलेल्या या दुर्घटनेने आंतरराष्ट्रीय संरक्षण मंचावरही हळहळ व्यक्त केली जात असून तेजसच्या अपघाताने पायलटच्या शौर्याला सलाम केला जात आहे.

आणखी वाचा