प्रभाग १ मध्ये महायुतीची प्रचारसभा उत्साहात; पारदर्शक काम केल्यास विजयी होणारच – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. २३ : रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये महायुतीच्या उमेदवारांची प्रचारसभा आज मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना सामंत म्हणाले की, “उमेदवारांनी आपल्या कार्यात पारदर्शकता ठेवून, विकासकामांना प्राधान्य देत आणि जनतेशी सतत संवाद साधत काम केले तर नगरपरिषदेत महायुतीला विजय मिळणार निश्चित आहे.” स्थानिक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेत जनतेचा विश्वास जिंकणे हे उमेदवार व कार्यकर्त्यांचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, आगामी निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि पूर्ण समर्पणाने काम करावे. जनतेच्या अडचणींचे निराकरण करण्यावर सर्वाधिक भर देत स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

सभेत जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजप जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार वैभवी खेडेकर, नितीन जाधव यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा