मालवणमध्ये निवडणूकपूर्वी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप; निलेश राणेंच्या कारवाईत भाजप पदाधिकारीच्या घरात लाखोंची रक्कम सापडली

मालवण, दि. २६ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय रंग उग्र होत चालला आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकून मोठा आरोप केला आहे. आमदार राणेंच्या म्हणण्यानुसार, मतदानाच्या तोंडावर भाजप कार्यकर्ते पैशांचे वाटप करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर थेट लाईव्ह करत ही माहिती दिली, तसेच घरात टेबलवर ठेवलेली बॅग दाखवली. त्यांच्या दाव्यानुसार, आणखी तीन ते चार बॅगा पैशांनी भरलेल्या घरात आढळल्या. ही कारवाई पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

निलेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मालवण येथे आले होते. निवडणुकी दरम्यान पक्षाचे काही पदाधिकारी पैशांचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शिवसेनेचे पथक त्यांच्या मागावर आहे. पैशांचे वाटप करून निवडणूक जिंकण्याचा हा प्रकार चुकीचा पायंडा घालणारा आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आम्ही गप्प बसणार नाही.”

आमदार राणेंच्या म्हणण्यानुसार, “मी निवडणूक अधिकाऱ्यांना इथे बोलावलं आहे. पोलीस उपस्थित आहेत. केवळ एक घर नाही, अशी आणखी ८ ते १० घरं आहेत. आम्ही पैशांना हात लावलेला नाही; पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे ताब्यात घ्यावेत आणि या प्रकरणाचा तपास करून सोक्षमोक्ष लावावा.”

दुसरीकडे, भाजपा मालवणचे नेते विजय केनवडेकर यांनी या आरोपावर प्रतिक्रिया देत सांगितले की, “हे पैसे बिल्डिंग मटेरियलसाठी जमा केले होते, निवडणुकीशी याचा काही संबंध नाही.”

राजकीय तज्ज्ञांच्या मते, या पोलखोलीनंतर मालवणमधील नगरपरिषद आणि पालिका निवडणुकीच्या राजकीय वातावरणात अधिकच तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला असून, निवडणुकीच्या अंतिम तयारीला याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा