रत्नागिरी, दि. २८ : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका मुक्त, शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात तसेच संबंधित भागात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार १ डिसेंबर (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर (मतदानाचा दिवस) व ३ डिसेंबर (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांमध्ये सर्व देशी-विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या (एकूण २८८) सदस्य पदासाठी व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण व खेड या नगरपरिषदा व लांजा, देवरुख, गुहागर या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान व दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ चे कलम १४२ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त आदेशान्वये, जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-२, एफएल-३. एफएल- ४ ( क्लब अनुज्ञप्ती), एफएल / बीआर-२, सीएल-२, सीएल-३, सीएल / एफएल/टिओडी-३, टिडी-१ इ.) १ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी दिले आहेत.
या आदेशाचे काटेकोर पालन न केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ५४ आणि ५६ नुसार संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूप रद्द करण्यात येऊ शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








