‘जायंट किलर’ आंद्रे रसेलची IPL मधून निवृत्ती; लिलावाआधीच घेतला मोठा निर्णय

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलनं आयपीएल क्रिकेटला अलविदा केला आहे. आयपीएल 2026 च्या लिलावाला काहीच दिवस उरले असताना रसेलने अचानक निवृत्तीची घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या रसेलचा सर्वाधिक प्रवास कोलकाता नाईट रायडर्स (KKR)सोबत झाला. 2014 पासून तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ तो KKR चा अविभाज्य भाग राहिला आणि संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले.

रसेलने ही घोषणा इंस्टाग्रामद्वारे केली. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, “नमस्कार केकेआर चाहते… मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण मी जगभरातील विविध लीगमध्ये आणि इतर सर्व केकेआर फ्रँचायझीसाठी खेळत राहीन.” आयपीएलमधील दिवस, सामन्यांमध्ये केलेले षटकार, संघाला दिलेले विजय आणि एमव्हीपी पुरस्कार मिळवलेले क्षण – या सर्व आठवणी आपणाबरोबर कायम राहतील, असं तो म्हणाला. पुढे त्याने सांगितलं की हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, पण आपल्या कारकीर्दीचा वारसा मजबूत ठेवण्यासाठी हा योग्य क्षण असल्याचं त्याला वाटलं.

आपल्याला इतर संघांच्या जर्सीत फोटोशॉप केलेले फोटो सोशल मीडियावर दिसणं त्याला विचित्र वाटायचं, असंही तो हसत हसत लिहितो. जांभळ्या आणि सोनेरी रंगातील केकेआर जर्सीतच स्वतःला पाहण्याची इतकी सवय झाली होती की दुसऱ्या रंगात स्वतःला पाहणं त्याच्या मनाला पटत नव्हतं. या विचारांनी तो अनेक रात्री झोपही गमावल्याचं त्यानं सांगितलं. स्वतःला ‘पॉवर कोच’ हे नाव मिळालं तेही त्याच्या शैलीशी जुळणारं असल्याचं रसेलनं नमूद केलं – फलंदाजीत शक्तीचा मारा, गोलंदाजीत ऊर्जा आणि क्षेत्ररक्षणात जीव ओतून खेळणारा असा हा खेळाडू पूर्णतः टीम प्लेयर राहिला.

आंद्रे रसेलची आयपीएल कारकीर्द अत्यंत झळाळलेली राहिली आहे. त्याने खेळलेल्या 140 सामन्यांमध्ये 115 डावांत 28.20 च्या सरासरीनं 2651 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 174.17 इतका दणदणीत आहे. गोलंदाजीतही तो तितकाच प्रभावी राहिला असून 121 डावांत त्याने 123 विकेट्स घेतल्या. गेल्या हंगामात त्यानं 10 डावांत 167 धावा केल्या, तर आयपीएल 2025 मध्ये गोलंदाज म्हणून त्यानं 9 डावांत 8 बळी घेतले. 2014 आणि 2024 मध्ये KKR ला मिळालेल्या जेतेपदात रसेलचा मोठा वाटा होता. 2019 मध्ये तर त्याला आयपीएलचा ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ हा सन्मानही मिळाला.

आयपीएलला निरोप देतानाच्या भावनिक संदेशात रसेलनं चाहत्यांचे, संघातील सहकाऱ्यांचे, आणि केकेआर व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानले. आयपीएलमधील त्याचा प्रवास संपला असला तरी जगभरातील T20 लीगमध्ये त्याची उपस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे ‘जायंट किलर’ रसेल पुन्हा मैदानात आपला दबदबा दाखवताना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा