संगमेश्वर, दि. ०३ : कसबा (ता. संगमेश्वर) येथील प्राचीन रामक्षेत्राच्या सान्निध्यात वसलेले श्री कर्णेश्वर मंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही कला व संगीताच्या महोत्सवाने उजळून निघणार आहे. १२, १३ आणि १४ डिसेंबर या तीन दिवसांत श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या सौजन्याने कर्णेश्वर कला-संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून, याआधी सोनिया परचुरे, चारुदत्तबुवा आफळे, पं. विश्वनाथ कान्हेरे, आदित्य ओक यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी येथे आपली कला सादर केली आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १२ डिसेंबर रोजी, रत्नागिरीतील नृत्यगुरू सौ. श्रुती आठल्ये (कथ्थक) आणि सौ. प्रणाली तोडणकर (भरतनाट्यम) यांचे सहकलाकारांसह संयुक्त सादरीकरण होणार आहे. कथ्थक आणि भरतनाट्यम या दोन शास्त्रीय नृत्यशैलींचे अनोखे दर्शन रसिकांना यावेळी अनुभवता येईल.
१३ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांच्या पखवाज एकल वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या पखवाज अलंकार परीक्षेत देशभरात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी कलेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मैफलीत मंदार दीक्षित (संवादिनी), विशारद गुरव (गायन), रोहित धुरी आणि अमित कामतेकर (पखवाज) यांची साथ लाभणार आहे.
तिसऱ्या दिवशी, १४ डिसेंबर रोजी, महोत्सवाची सांगता अभेद शौनक अभिषेकी यांच्या गायन मैफलीने होणार आहे. जेष्ठ गायक स्व. जितेंद्र अभिषेकी यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांचे सुपुत्र असलेल्या अभेद यांच्या सादरीकरणाची रसिकांना विशेष उत्सुकता आहे. त्यांच्या साथीला तबला वादक प्रशांत पांडव, संवादिनीवादक वरद सोहनी आणि पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांची साथ लाभेल. तिन्ही दिवशी कार्यक्रमास रात्री नऊ वाजता सुरुवात होईल.
महोत्सवाच्या दरम्यान मंदिर प्रांगणात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे आणि डी कॅड कॉलेज, देवरुख येथील विद्यार्थ्यांचे चित्र आणि शिल्पकला प्रदर्शनही भरवले आहे. मंदिराभोवती लावण्यात आलेल्या हेरिटेज लाइट्समुळे रात्रीच्या वेळी मंदिराची शान अधिक खुलते आणि प्रांगण विलोभनीय भासते. संपूर्ण महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य असून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री धनंजय प्रभुघाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘कर्णेश्वरी साडी’चे प्रकाशन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) डॉ. आसावरी संसारे, तहसीलदार सौ. अमृता साबळे आणि अभिनेत्री व निवेदिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडेल. कर्णेश्वर मंदिरावरील निवडक नक्षी साडीच्या दोन्ही काठांवर विणण्यात आली असून, कोकणातील वातावरणाचा विचार करून ही साडी सेंद्रिय सुती धाग्यांनी तयार करण्यात आली आहे. एक साडी विणण्यासाठी किमान पाच तास लागतात, ही तिची एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.








