चिपळूण, दि. ०३ : चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी पार पडले असून मतमोजणीपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न ठेवण्यासाठी आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संयुक्त निवेदन सादर केले आहे. कोर्ट आदेशांनुसार निवडणूक कार्यक्रमात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूमची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची आणि मतमोजणी दिवशी विशेष उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी आमदार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळात शिरीष काटकर, फैसल कास्कर, मोहन शेठ मिरगल, निहार गुढेकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुराद आड्रेकर, शहर अध्यक्ष रतन पवार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांचा समावेश होता.
निवेदनात मतमोजणी प्रक्रियेला कोणतीही बाधा न येता पूर्ण पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत—
स्ट्रॉंग रूमला ‘झेड प्लस’ सुरक्षा :
मतदान यंत्रणा (EVM) ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेत तातडीने मोठी वाढ करावी, असा आग्रह व्यक्त करण्यात आला आहे.
नेटवर्क जॅमर बसवण्याची मागणी :
कोणताही गैरप्रकार अथवा अनावश्यक संपर्क टाळण्यासाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र परिसरात नेटवर्क जॅमर बसवावेत, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.
मतमोजणी केंद्राभोवती संचारबंदीची मागणी :
मतमोजणी पूर्ण होईपर्यंत १००० मीटर परिसरात संचारबंदी लागू करून शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
अनाधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी :
मतमोजणी केंद्राभोवती कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा उमेदवारांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी त्यांचा प्रवेश बंद करण्याची मागणी झाली आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी राजकीय बैठका होऊ देऊ नयेत, असेही निवेदनात नमूद आहे.
EVM पुनर्पडताळणीचा आग्रह :
पारदर्शकता वाढवण्यासाठी आवश्यक असल्यास EVM यंत्रणांची पुनर्तपासणी किंवा पुनर्प्रशिक्षण करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांच्यासह आघाडीतील नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार—आरिफ हजवाने, इम्तियाज मुकादम, अजय भालेकर, वैशाली कदम, शैलेश टाकळे, नसरीन खडस, डॉ. नियाझ पाते, समिधा जोगळे, राहुल कांबळे, सपना पवार, राजेश केळसकर, नगमा रियाने, सुनील कुलकर्णी, साक्षी शिंदे, अॅड. अजय कांबळी, नुपुर बचीम, राकेश दाते, युगंधरा शिंदे, सानिका टाकळे, मोहन मिरगल, उमा देसाई, गणेश फके, महाडीक, विकी नरळकर आणि कांचन शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
मतमोजणी प्रक्रिया शांत, सुव्यवस्थित आणि पूर्णपणे निष्पक्ष पार पडावी, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याची मागणी आघाडीतील उमेदवारांनी एकमुखाने केली आहे.








