गोव्यातील नाईट क्लबमध्ये भीषण आग; २५ जणांचा मृत्यू

अर्पोरा,दि. ०७ : उत्तर गोवा—गोव्यातील पर्यटन क्षेत्राला हादरा देणारी आणि देशभरात खळबळ उडवणारी ही भीषण घटना शनिवारी (६ डिसेंबर) मध्यरात्री घडली. ‘बर्च बाय रोमियो लेन’ या लोकप्रिय नाईट क्लबमध्ये अचानक सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही सेकंदांतच आग संपूर्ण परिसरात पसरली. काहीच क्षणात ज्वाळांनी रौद्ररूप धारण करत संपूर्ण क्लबला ग्रासले आणि अवघ्या मिनिटांत इमारत जळून खाक झाली. या आगीत २५ लोकांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. मृतांमध्ये १४ क्लब कर्मचारी असून काही पर्यटकांचाही समावेश आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्यात क्लबमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान अचानक ठिणगी पडताना आणि त्यानंतर काही सेकंदांतच उसळलेल्या प्रचंड ज्वाळा दिसून येत आहेत.

रात्रीच्यावेळी हाय-फाई कार्यक्रम सुरू असताना अचानक सुरू झालेल्या या गोंधळामुळे ग्राहक आणि कर्मचारी घाबरून पळू लागले; पण क्लबची रचना, अरुंद मार्ग आणि निकृष्ट बांधकामामुळे बाहेर पडण्याचे मार्ग तात्काळ बंद झाले. धुराने अवघ्या काही क्षणांतच क्लबला वेढा घातल्याने अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आग वरच्या मजल्यावरून सुरू झाली होती, तर पोलिसांनी प्राथमिक तपासात गॅस सिलेंडरचा स्फोट हे कारण सांगितले. या विरोधाभासी दाव्यांमुळे आगीचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी मिळालेल्या अवशेषांचे फॉरेन्सिक विश्लेषण झाल्यानंतरच सत्य समोर येईल, असा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला आहे.

घटना घडल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले; मात्र क्लबकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद व वळणांनी भरलेला असल्याने अग्निशमन दलाची वाहने जवळ पोहोचू शकली नाहीत. त्यांना सुमारे ४०० मीटर लांब गाड्या उभ्या ठेवून तिथूनच पाइप टाकत आग विझवावी लागली. या विलंबामुळेच मृतांची संख्या वाढल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी मान्य केले आहे. विशेष म्हणजे, क्लबचे बांधकाम तात्पुरत्या स्वरूपाचे असून ताडपत्री व इतर ज्वलनशील साहित्याने बनवले गेले होते. त्यामुळे आग नेमकी कोणत्या दिशेने पसरत आहे हे समजण्याआधीच संपूर्ण रचना जळून कोसळली.

तमाम देशाचे लक्ष वेधून घेणारा आणखी एक मुद्दा म्हणजे हा नाईट क्लब बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचा आरोप. अर्पोरा-नागोवा ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले की क्लबकडे कोणताही अधिकृत बांधकाम परवाना नव्हता. यापूर्वी पंचायतीने पाडकामाची नोटीस बजावली होती; मात्र क्लबने पंचायत संचालनालयात अपील केल्यानंतर ती स्थगित करण्यात आली. इतकेच नव्हे तर हा क्लब सीआरझेड संवेदनशील क्षेत्रात उभारण्यात आल्याचेही आरोप आहेत, जिथे बांधकाम करणे नियमबाह्य आहे. स्थानिक लोकांमध्येही या क्लबबाबत आधीपासून नाराजी होती, विशेषतः येथे दररोज मोठ्या प्रमाणात होणारा आवाज, वाहतूक कोंडी आणि सुरक्षा नियमांची तरतूद नसल्याने.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मान्य केले की क्लबमध्ये अग्निसुरक्षेसंदर्भात गंभीर त्रुटी होत्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गांची रचना अत्यंत निकृष्ट दर्जाची होती. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोव्यातील सर्व नाईट क्लबांचे पुन्हा एकदा सुरक्षा ऑडिट करण्याची गरज असल्याचे सांगत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेनंतर गोव्यातील पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे, कारण हा भाग पर्यटकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून पोस्ट करत मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आणि मृतांचे वारसदारांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत घोषित केली. राज्य सरकारनेही बचावकार्यातील त्रुटी तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचे संकेत दिले आहेत.

घटनास्थळी मिळालेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये क्लबच्या आतील भागाचे अतिशय भीषण दृश्य दिसत आहे. जळलेल्या भिंती, कोसळलेली छपरे आणि काळवंडलेली धातूची संरचना पाहताच दुर्घटनेचे भयावह रूप स्पष्ट होते. काही प्रत्यक्षदर्शी महिला आणि पर्यटकांनी सांगितले की आग लागताच इतका धूर भरला की दोन पावले पुढे कोण आहे हेही दिसत नव्हते. सायरन वाजू लागला, लोक आरडाओरडा करू लागले आणि काही क्षणांतच सर्वकाही संपल्यासारखे झाले.

गोव्यातील हा अग्नितांडव केवळ एक अपघात नसून अनियंत्रित बांधकामे, निकृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनातील निष्काळजीपणाची मोठी घंटा आहे. या घटनेत नेमके कोण दोषी, कोणत्या पातळीवर त्रुटी झाल्या आणि अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून कोणती पावले उचलली जातील, याची उत्तरे आगामी चौकशीतून मिळतील. मात्र गोव्याच्या पर्यटन विश्वासार्हतेवर बसलेला हा डाग किती काळ टिकणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

आणखी वाचा