मुंबई सीएसएमटी स्थानकावर उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची मागणी मान्य

नागपूर, दि. ०९ (अनिल फाळके): छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. आमदार भास्करराव जाधव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात टर्मिनसवर शिवरायांचा पुतळा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता.

या प्रस्तावावर केंद्र सरकारच्या रेल्वेमंत्र्यांनी एक आराखडा मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी सादर केला होता. त्यानुसार नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार भास्करराव जाधव यांनी आज पुन्हा या विषयावर सभागृहात प्रश्न उपस्थित करत जुन्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राने मांडलेला आरंभीचा प्रस्ताव हा जुना असून, तो ग्राह्य धरला जाणार नाही. राज्य सरकारने नुकताच पाठवलेल्या नवीन प्रस्तावानुसारच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा उभारला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच मुंबईतील महत्त्वाच्या स्मारकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचे तेज अधिक उजळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

आणखी वाचा