स्नेहसंमेलन म्हणजे शिक्षणासोबत कला, कौशल्य, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम – अन्वर मोडक

सावर्डे, दि. १२ (प्रतिनिधी): सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शानदार उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. शालेय जीवनातील सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाची भूमिका बजावते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आल्याचे विद्यालयाचे माजी प्राचार्य अन्वर मोडक यांनी सांगितले. “स्नेहसंमेलन हा शिक्षणाबरोबरच कला, कौशल्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम असून विद्यार्थ्यांनी त्या माध्यमातून आपल्या प्रतिभेला प्रोत्साहन द्यावे,” असे ते म्हणाले.

उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे ज्येष्ठ संचालक मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, सचिव महेश महाडिक, सरपंच समीक्षा बागवे, माजी सरपंच सुभाष मोहिरे, उद्योजक प्रशांत निकम, माजी प्राचार्य अन्वर मोडक, रफिक मोडक, सेवानिवृत्त शिक्षक सलीम मोडक, सुधीर महाडिक, दिलीप डंबे, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य व स्नेहसंमेलन प्रमुख विजय चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. चंद्रकांत सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि आकाशात फुगे सोडून स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या क्षणी विद्यार्थ्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला.

उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते फनी गेम्स, चित्रकला प्रदर्शन, गणित प्रतिकृती प्रदर्शन आणि रंगावली दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व दालनांना पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्नशील असून विविध स्पर्धांमधील यशातून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, असे मत चंद्रकांत सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केले.

स्नेहसंमेलनातील मिकी माऊसचे आकर्षक रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ही सर्व दालने 12 व 13 डिसेंबर रोजी सर्वांसाठी खुली राहणार आहेत. तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.

आणखी वाचा