पिंपरी-चिंचवड, दि. १३ : येत्या १९ डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. भारताचा पंतप्रधान बदलण्याची शक्यता असून, पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती विराजमान होऊ शकते, असे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ही व्यक्ती भाजपचीही असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘जनगणमन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमानंतर पिंपरी-चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. आपल्या दाव्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, सध्या जागतिक राजकारणात घडत असलेल्या घटनांचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. “१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल,” असा दावा त्यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील काही घडामोडींचा उल्लेख करताना सांगितले की, इस्त्राईलशी संबंधित एका गुप्तहेर प्रकरणात मोठ्या प्रमाणावर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. या व्यक्तीने अनेक प्रभावशाली लोकांच्या बंगल्यांमध्ये गुप्त कॅमेरे लावून माहिती गोळा केल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणातून लवकरच अनेक दिग्गज व्यक्तींची नावे उघड होणार असून, त्यामुळे अमेरिकेत मोठी राजकीय खळबळ उडण्याची शक्यता आहे, असे चव्हाण म्हणाले.
त्यांच्या मते, अमेरिकन सरकार या संदर्भात एक विशेष कायदा करून येत्या १९ डिसेंबरला संबंधित व्यक्तींची नावे जाहीर करू शकते. या घडामोडींचे पडसाद भारताच्या राजकारणातही उमटू शकतात. मात्र, “या यादीत नेमकी कोणती नावे असतील, याची मला सविस्तर माहिती नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भारतात जर पंतप्रधान बदल झाला, तर तो काँग्रेसचा पंतप्रधान नसेल, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे मांडले. “सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसकडे बहुमत नाही,” असे सांगत त्यांनी संभाव्य सत्तांतर वेगळ्या राजकीय समीकरणांतून घडू शकते, असा संकेत दिला.
याआधी आठवडाभरापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही चव्हाण यांनी असाच दावा केला होता. अमेरिकेत सुरू असलेल्या ‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या कागदपत्रांचा संपूर्ण तपशील जाहीर झाल्यास त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणासह भारताच्या राजकारणावरही होऊ शकतात. जेफ्री एपस्टाईन या अमेरिकन उद्योगपतीशी संबंधित सुमारे दहा हजार कागदपत्रे अमेरिकन संसदेच्या ताब्यात असून, ती सार्वजनिक झाल्यास अमेरिकेतील काही प्रमुख नेत्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.








