देवरूख नगरपंचायत : नगराध्यक्षपदी भाजपाच्या मृणाल शेट्ये यांचा दणदणीत विजय

देवरूख, दि. २१ : देवरूख नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या मृणाल शेट्ये यांनी नगराध्यक्षपदावर १८०० मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला या निवडणुकीत एकूण १७ पैकी १० जागांवर यश मिळाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत मृणाल शेट्ये यांनी ३६८९ मते मिळवत शिवसेना (उबाठा) यांच्या सबुरी थरवळ (१८८४) आणि गाव पॅनलच्या स्मिता लाड (१८६२) यांचा एकतर्फी पराभव केला. यामुळे मृणाल शेट्ये पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.

महायुतीचे वर्चस्व, मात्र समीकरणांत बदल
देवरूख नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व कायम असले तरी, गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपाचे संख्याबळ काहीसे कमी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे.

महायुतीतील विजयी उमेदवारांमध्ये
भाजप : ३
शिवसेना (शिंदे गट) : ३
राष्ट्रवादी काँग्रेस : ४
असा समावेश आहे.

अपक्षांचा धक्कादायक उदय
या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे चार अपक्ष उमेदवारांचा ऐतिहासिक विजय. यापूर्वी देवरूख नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना यश मिळाले नव्हते. मात्र यंदा प्रभाग क्रमांक ८, ९, १० आणि ११ मध्ये अपक्षांनी बाजी मारत इतिहास घडवला.
प्रभाग १० मध्ये अपक्ष अक्षय झेपले यांनी भाजपाचे बंटी पाडळकर यांचा पराभव केला. प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्षा वणकुंद्रे यांचा भाजप बंडखोर कविता नार्वेकर यांनी पराभव केला. प्रभाग ८ मधून अपक्ष सिद्धेश वेल्हाळ यांनी भाजप व उबाठा उमेदवारांचा पराभव करत धक्कादायक विजय मिळवला.

दिग्गजांना मतदारांचा नकार
या निवडणुकीत काही प्रमुख नेत्यांना मतदारांनी नकार दिला. प्रभाग ११ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षांचे विश्वासू सहकारी हनिफ हरचिरकर, तर प्रभाग १६ मधून माजी सभापती व उबाठा युवासेनेचे नेते छोट्या गवाणकर यांचा पराभव झाला.

इतर पक्षांची स्थिती
शिवसेना (उबाठा) : ३ जागा
अपक्ष : ४ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व राष्ट्रीय काँग्रेस : खातेही उघडले नाही

प्रभागनिहाय विजयी उमेदवार
१) समृद्धी वेलणकर (भाजपा)
२) यशवंत गोपाळ (राष्ट्रवादी)
३) संदीप गेल्ये (शिवसेना)
४) वैभव पवार (शिवसेना)
५) स्वाती राजवाडे (भाजपा)
६) प्राची भुवड (राष्ट्रवादी)
७) श्रद्धा इंदुलकर (भाजपा)
८) सिद्धेश वेल्हाळ (अपक्ष)
९) सौ. कविता नार्वेकर (अपक्ष)
१०) अक्षय झेपले (अपक्ष)
११) अनुराग कोचिरकर (अपक्ष)
१२) बाळा कामेरकर (उबाठा)
१३) रितिका कदम (उबाठा)
१४) नेहा आंबेकर (शिवसेना)
१५) निधा कापडी (उबाठा)
१६) दिपक खेडेकर (राष्ट्रवादी)
१७) रुपाली बेंद्रे (राष्ट्रवादी)

मतमोजणी शांततेत
सकाळी १० वाजता नगरपंचायत सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमृता साबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या देखरेखीखाली मतमोजणी शांततेत पार पडली. निवडणूक काळात पोलीस निरीक्षक झावरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देवरूख नगरपंचायतीच्या निकालाने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार झाली असून, आगामी काळात सत्ताधाऱ्यांसमोर विकास व प्रशासनाची मोठी आव्हाने असणार आहेत.

आणखी वाचा