चिपळूण, दि. २४ : वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वतीने आयोजित ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव सलग तिसऱ्या वर्षी नव्या जोमाने आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा कृषी महोत्सव ५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत बहाद्दरशेख नाका येथील चिपळूण नगर परिषदेच्या स्वा. वि. दा. सावरकर मैदानावर भरविण्यात येणार आहे, अशी माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या कृषी महोत्सवामुळे चिपळूण आणि कोकण ‘कृषीची पंढरी’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेली होती. मात्र या समजुतीला छेद देत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात आलेला मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा दुग्ध प्रकल्प अल्पावधीतच दर्जेदार उत्पादनांमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला असून यशस्वी वाटचाल करीत आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचे नवे दालन खुले करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे या प्रकल्पामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बहाद्दरशेख नाका शाखेच्या अर्थसहाय्याने वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अत्यल्प कालावधीत हा अत्याधुनिक दुग्ध प्रकल्प उभा राहिला. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने, तर राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन करण्यात आले होते.
कोकणात यापूर्वी काही दुग्ध प्रकल्प सुरू झाले असले तरी विविध कारणांमुळे ते दीर्घकाळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी मानसिकता तयार झाली होती. ही मानसिकता बदलून कोकणातील शेतकरीही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे सक्षम आणि स्पर्धात्मक व्हावेत, हे स्वप्न सुभाष चव्हाण यांनी पाहिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरी प्रकल्प यशस्वीपणे उभा राहिला असून या माध्यमातून स्थानिक शेतकरी आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे सलग दोन वर्षे कृषी व पशुधन प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पहिल्या वर्षी तीन दिवसांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर गतवर्षी हे प्रदर्शन पाच दिवसांचे करण्यात आले. कोकणातील हा पहिलाच कृषी प्रदर्शनाचा प्रयोग ठरला असून लाखो कृषीप्रेमी, शेतकरी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यंदाही पाच दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला.
या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्टॉल नोंदणीसाठी इच्छुकांनी ९४२२६६११९७, ९६३७६०५७५७, ७५८८३३००११, ९८९०३९३८२३, ७७२२०४५०४८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शनात १०० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. विशेष चर्चासत्र कक्ष, पशुपक्षी व प्राणी प्रदर्शन, फ्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, आधुनिक व वैविध्यपूर्ण कृषी अवजारे, मान्यवरांचे मार्गदर्शन, पिलरलेस दोन भव्य शामियाने, परदेशी भाजीपाला तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी यावेळी पाहायला मिळणार आहे.
वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन कोकणातील कृषी व्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सशक्त पूल – प्रशांत यादव
चिपळूण शहरातील स्वा. वि. दा. सावरकर मैदान येथे ५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शनाच्या सभा मंडप व इतर कामांचा शुभारंभ वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले की, वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन हे केवळ स्टॉल्सचे प्रदर्शन नसून, शेतीविषयक विचारांचे व्यासपीठ, अनुभवांची देवाणघेवाण आणि कोकणातील संपूर्ण कृषी व्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सशक्त पूल आहे. यावेळी मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.








