दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू; सकपाळ कुटुंबावर शोककळा

दापोली, दि. २७ : कोकणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात घडली. मुंबई-कल्याण परिसरातून पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आंचल मदन सकपाळ (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे.

सकपाळ कुटुंब २५ डिसेंबर रोजी दापोली तालुक्यातील आंजर्ले परिसरात पर्यटनासाठी आले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांनी दापोली आणि परिसरातील पर्यटनस्थळांचा आनंद घेतला. शनिवार, दि. २७ रोजी सकाळी हे कुटुंब मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी निघणार होते. मात्र सकाळी मुलगी आंचल हिला उठवण्यासाठी गेले असता ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिचे शरीर थंड पडलेले असून दातखिळी बसल्याचे दिसून आले. यामुळे कुटुंबीयांची घबराट उडाली.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने आंचल हिला तातडीने आंजर्ले येथील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर आंचल हिला मृत घोषित केले.

आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. कुटुंबाची ती एकुलती एक लाडकी सुकन्या होती. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ती काही वेळ आनंदात खेळली होती. कोणतीही तक्रार नसताना झोपलेल्या आंचलचा रात्रीच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, नगरपंचायत अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर व सहाय्यक निरीक्षक यादव यांनीही रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.

आंचल हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असावा, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबांमध्येही चिंता व्यक्त होत असून, संपूर्ण दापोली परिसरात शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा