‘क्रांतीज्योती विद्यालय’चा यशस्वी प्रवास; रत्नागिरीत दिग्दर्शक-कलाकारांची भेट

रत्नागिरी, दि. १८ : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘क्रांतीज्योती विद्यालय’ हा चित्रपट विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. १ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यशाचा तिसरा आठवडा पूर्ण केला असून, या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे तसेच प्रमुख भूमिकेतील अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी रत्नागिरीतील ‘सिटी प्राईड’ चित्रपटगृहाला भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटामागील भूमिका, मराठी शाळांची सद्यस्थिती आणि समाजावर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले की, चित्रपटाचे प्रमोशन केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर, संभाजीनगर, जळगावनंतर आता कोकण दौऱ्यावर आम्ही आलो आहोत. अलिबागच्या नागाव येथील मराठी शाळेत चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून, कोकणातील निसर्ग आणि संस्कृतीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अधिक जवळ जात आहे. अमेय वाघने साकारलेले ‘आगरी’ पात्र विशेषतः प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, पेण येथे या पात्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी शाळांच्या ढासळत्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना ढोमे म्हणाले, “आज अनेक मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. काही शाळांमध्ये दहावीपर्यंत केवळ दोन-तीन शिक्षक उरले आहेत. राजगडच्या पायथ्याशी असलेल्या भोरमधील एका शाळेत तर फक्त एकच विद्यार्थी असूनही शिक्षक शाळा टिकवण्यासाठी झटत आहेत. हे वास्तव पाहूनच मनोरंजनाच्या माध्यमातून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला.”

चित्रपटाचा समाजावर सकारात्मक परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक पालकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून पुन्हा मराठी शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे अनुभव त्यांनी सांगितले. काही महिलांनी हा चित्रपट म्हणजे ‘मराठी संस्कृतीवरील संस्कार’ असल्याची प्रतिक्रिया दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिक्षण क्षेत्रातील वाढते व्यापारीकरण आणि भाषेच्या अस्तित्वावर बोलताना ढोमे म्हणाले की, मराठी शाळा वाचवणे हे केवळ सरकार किंवा एखाद्या पक्षाचे काम नसून संपूर्ण महाराष्ट्राचे सामूहिक कर्तव्य आहे. पुढील १५-२० वर्षांत मराठी लिहिणारी-बोलणारी पिढी उरेल का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या चित्रपटामुळे किमान समाजात गंभीर चर्चा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढील आठवड्यात चित्रपटाची टीम विदर्भ दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

आणखी वाचा