रत्नागिरी, दि. ०१ : कर सल्लागार असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता बजेट सेमिनार २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पीय सत्राचे थेट प्रक्षेपण सभासदांसाठी पाहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अर्थसंकल्पातील विविध तरतुदी, करप्रणालीतील बदल तसेच व्यावसायिकांवर होणारा परिणाम यावर उपस्थित तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बजेट सत्रानंतर दुपारी १२.३० वाजता वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
सायबर सुरक्षा, समाजहित व जनजागृती क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल मा. डॉ. अक्षय फाटक यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्या सभासदांपैकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ. निशा आंबेकर व श्री. राजेंद्र भावे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार वितरण समारंभ ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट श्री. एच. एल. पटवर्धन यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. रमाकांत पाथरे, उपाध्यक्ष सी. ए. अभिजीत पटवर्धन, खजिनदार सी. ए. ऋषिकेश फडके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव ॲड. रविंद्र साळवी व कार्यकारिणी सदस्य श्री. धनेश रायकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमामुळे कर सल्लागारांना केंद्रीय अर्थसंकल्पाची सखोल माहिती मिळाल्याबरोबरच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे कार्यही साध्य झाले, अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.








