नगर येथे झालेल्या शालेय विभागीय युनिफाईड कराटे स्पर्धेत शौर्य वनगे याला सुवर्णपदक

चिपळूण, दि. ०१ : नगर येथे दि. २३/०१/२०२६ रोजी पार पडलेल्या शालेय विभागीय युनिफाईड कराटे स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील आकले धामणखोरी – निंबारेवाडी येथील माजी सरपंच कै. बाबाजी महादेव वनगे यांचे नातू शौर्य प्रसाद वनगे याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले आहे. या यशामुळे त्याची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शौर्य वनगे हा संकल्प फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा विद्यार्थी असून त्याला संस्थेचे सचिव चंद्रकांत राहींज, वैशाली बांगर, योगेश वागस्कर व सुप्रिया तीर्लोटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तो सध्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शनिवार पेठ येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे.
शौर्यच्या या यशामुळे आकले गावाचे नाव जिल्हा व राज्यस्तरावर उज्ज्वल झाले असून संपूर्ण गावाला त्याचा अभिमान वाटत आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने शौर्य वनगे याचे कौतुक करण्यात आले असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शौर्यच्या या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आणखी वाचा