मुंबई, दि. ०२ : महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वेच्या समन्वयाने यशवंतपूर–मडगाव–यशवंतपूर विशेष एक्स्प्रेस रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष गाडी चालवण्यात येणार असून त्यामुळे कर्नाटक व गोवा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 06507 यशवंतपूर–मडगाव एक्स्प्रेस स्पेशल शुक्रवार, दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता यशवंतपूर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6.45 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
तसेच, गाडी क्रमांक 06508 मडगाव–यशवंतपूर एक्स्प्रेस स्पेशल सोमवार, दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4.45 वाजता यशवंतपूर येथे पोहोचेल.
प्रमुख थांबे
ही विशेष गाडी पुढील स्थानकांवर थांबणार आहे –
चिकबनावर, चन्नारायणपट्टण, हसन, साकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, काबकापुत्तूर, बंटवाल, सुरथकल, मुळकी, उडुपी, बारकूर, कुंडापूर, मूकांबिका रोड (बिंदूर), भटकल, मुर्देश्वर, होन्नावर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला व कारवार.
डब्यांची रचना
या विशेष रेल्वेगाडीत एकूण 20 डबे असतील. त्यामध्ये –
संयुक्त प्रथम वर्ग व द्वितीय वातानुकूलित (Composite) : 1 डबा
द्वितीय वातानुकूलित (2A) : 2 डबे
तृतीय वातानुकूलित (3A) : 2 डबे
स्लीपर : 9 डबे
जनरल : 4 डबे
एसएलआर (गार्ड व लगेज व्हॅन) : 2 डबे
महाशिवरात्रीच्या निमित्ताने गोवा, कर्नाटक व कोकण भागात जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून या विशेष गाडीमुळे प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.