दापोली, दि. ११ : खानदेशातील एका शेतमजूर कुटुंबातून आलेल्या साधना वैराळे महाजन यांनी अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वीय सहाय्यक ते जिल्हा परिषद सदस्य असा प्रेरणादायी प्रवास घडवून आणला आहे. एमएससी (फिजिक्स) पदवीधर असलेल्या साधनाताईंचा जीवनप्रवास आजच्या युवावर्गासाठी आदर्श ठरत आहे.
अवघ्या दीड वर्षांच्या असताना आई-वडिलांनी त्यांना आजोबांकडे सोपवले. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. प्राथमिक शिक्षण घेत असताना सातवीत शिकत असताना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीसाठी आयोजित स्पर्धा परीक्षेची ३० रुपयांची फी भरण्यासही पैसे नव्हते. ही रक्कम मैत्रिणीने भरली. त्या परीक्षेत शाळेतील ७२ मुलींमधून त्यांची निवड झाली. याच घटनेनंतर आजोबांनी “काहीही झालं तरी हिला उच्च शिक्षण द्यायचं” असा निर्धार केला.
दारिद्र्याच्या छायेत शिक्षण घेताना त्यांनी घरकामाबरोबरच कोंबड्या सांभाळल्या, गावातून दूध गोळा करून ताक बनवून सायकलवर विक्री केली. अनेकदा घरात स्वयंपाकासाठी तेलही उपलब्ध नसे. मात्र या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी एमएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
अमळनेर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी त्यांचा संपर्क आला आणि तेथून सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात झाली. पुढे जळगाव येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली. त्याच काळात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या फेलोशिपसाठी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली.
भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. सहा महिन्यांतच उमाताई खापरे विधान परिषदेच्या आमदार झाल्या आणि साधनाताईंच्या कार्याची दखल घेऊन त्यांची स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या काळात त्यांना प्रशासकीय व राजकीय कामकाजाचा जवळून अनुभव घेता आला.
दरम्यान, कोकणातील ओळखीमधून मिहीर महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ज्या पक्षातून त्या कार्यरत होत्या त्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. मोठ्या मताधिक्याने त्या निवडून आल्या.
आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना साधना वैराळे महाजन म्हणाल्या, “शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महाजन परिवारासह सर्व कार्यकर्त्यांचा माझ्या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन.”
पुढील काळात महिला बचत गटांचे प्रश्न, मच्छीमारांचे व बागायतदारांचे प्रश्न तसेच या भागातील बेरोजगारीवर काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एक वर्षाच्या बाळाची आई असतानाही पती, सासू-सासरे यांचा मिळालेला पाठिंबा या यशामागील मोठी ताकद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
शेतमजूर कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास आज जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत पोहोचला असून साधना वैराळे महाजन यांची ही संघर्षकथा अनेक तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.







