रत्नागिरी, दि. १२ : भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महानगर गॅस लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरिता मोफत सहाय्यक उपकरणे वितरणासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ व बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिराचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील गरजू व पात्र दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक असलेली सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देणे हा आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या हालचाली सुलभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
या शिबिरासाठी पात्र दिव्यांग प्रवर्गात अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सीग्रस्त, कर्णबधीर, ९० टक्क्यांवरील अंध तसेच कुष्ठरोग निवारीत दिव्यांग व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र बौद्धिक अक्षम दिव्यांग व्यक्तींची या शिबिरात तपासणी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिबिरासाठी सहभागी होणाऱ्या दिव्यांगांनी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामध्ये किमान ४० टक्क्यांवरील अपंगत्व दर्शविणारे UDID कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच आधार कार्ड आवश्यक असून रेशन कार्डावर वार्षिक उत्पन्न रु. २ लाख ७० हजारांपेक्षा कमी असल्याची नोंद असणे आवश्यक आहे. याशिवाय संजय गांधी निराधार पेन्शन प्रमाणपत्र किंवा लोकप्रतिनिधींचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरला जाईल.
तसेच मागील तीन वर्षांत अलिम्को संस्थेकडून त्याच प्रकारच्या सहाय्यक उपकरणाचा लाभ घेतलेला नसावा, ही अट ठेवण्यात आली आहे. बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल किंवा स्मार्टफोनचा लाभ मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तपासणीअंती पात्र ठरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअर, कुबड्या, एलबो क्रचेस, वॉकिंग स्टिक, श्रवणयंत्र, स्मार्टफोन, ब्रेल किट, सी.पी. चेअर, बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल तसेच ADL किट यांसारखी विविध सहाय्यक उपकरणे मोफत वितरित करण्यात येणार आहेत.
हे शिबिर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, डी-मार्ट समोर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होण्यापूर्वी दिव्यांगांनी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ९८३४४४०२०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती सुनिता शिरभाते यांनी केले आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी वेळेत नोंदणी करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.








