तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी कोकण रेल्वेची विशेष मोहीम; जानेवारीत 44 हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई

रत्नागिरी, दि. १२ : तिकीटविरहित व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेकडून संपूर्ण मार्गावर सातत्याने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. प्रवाशांचा सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

जानेवारी 2026 महिन्यात कोकण रेल्वेने एकूण 1014 विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या. या मोहिमांदरम्यान 44,736 तिकीटविरहित व अनियमित प्रवाशांची नोंद करण्यात आली. या प्रवाशांकडून रेल्वे भाडे व दंड स्वरूपात 2 कोटी 53 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

जानेवारी 2026 अखेरपर्यंत कोकण रेल्वेने एकूण 9,495 विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या असून, त्यातून 4 लाख 13 हजार 637 तिकीटविरहित व अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून रेल्वे भाडे व दंडापोटी एकूण 22 कोटी 81 लाख रुपयांची वसुली झाली आहे.

ही विशेष मोहीम रेल्वे संरक्षण दल (RPF) तसेच रेल्वे अधिकारी यांच्या समन्वयाने कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावरील स्थानके व धावत्या गाड्यांमध्ये राबवण्यात येत आहे. तिकीटविरहित प्रवासामुळे प्रामाणिक प्रवाशांना गैरसोय होते तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रवासाला आळा घालण्यासाठी ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर विशेष व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी आरपीएफ व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये कडक तपासणी करण्यात येणार असून, प्रवाशांच्या सुरक्षित, सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.

कोकण रेल्वेने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करताना सांगितले आहे की, तिकीटविरहित प्रवास टाळून नियमांचे पालन केल्यास सर्वांसाठी रेल्वे सेवा अधिक सुरळीत व विश्वासार्ह होईल.

आणखी वाचा