मुंबई, दि. १७ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आटोपल्यानंतर राजापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील २१ रिक्त सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.
ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता अथवा इतर कारणांमुळे निर्माण झालेल्या रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत, त्या सर्व जागांचा समावेश या मतदार यादी कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यासाठी १ जुलै २०२५ अखेरची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी १६ ते २० फेब्रुवारी २०२६ असा ठेवण्यात आला आहे. प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रशासनाला देण्यात आले आहेत.
राजापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणाऱ्या जागांची यादी पुढीलप्रमाणे आहे. कोळवणखडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण व प्रभाग क्रमांक २ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाणार ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या एका जागेसाठी पोटनिवडणूक होईल. झर्ये ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.
वडदहसोळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या एका जागेसाठी, येळवण ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जाती या जागेसाठी, हातिवले ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण महिला जागेसाठी तसेच खरवते ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण महिला जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केळवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २, ३ व ४ मधील सर्वसाधारण महिला या तीन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तसेच माडबन ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण महिला, भालावली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधील सर्वसाधारण, कळसवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला या दोन जागांसाठी निवडणूक होईल. कोंडये तर्फे सौंदळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग व प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण जागेसाठीही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. याशिवाय साखर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रिंदावण ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण तसेच धाऊलवल्ली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
या पोटनिवडणुकांमुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या कारभाराला पूर्ण स्वरूप मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व पुन्हा सक्षम होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना मतदार यादी तपासून आवश्यक त्या हरकती व सूचना वेळेत दाखल करण्याचे आवाहन केले आहे.








