रत्नागिरी, दि. २६ : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मंडणगड तालुक्याला जाणार असल्याचे निश्चित झाले असून, चिपळूण तालुक्याला महिला बालविकास आणि शिक्षण खात्याचे सभापतिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी कोणत्या जिल्हा परिषद सदस्याची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीला की भाजपला ही संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
चिपळूण तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन आणि भाजपचे दोन सदस्य निवडून आले आहेत. भाजपला तब्बल २० वर्षांनंतर चिपळूण तालुक्यात यश मिळाले असून त्यामुळे सभापतिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद व चिपळूण पंचायत समितीची निवडणूक शिवसेना-भाजप युती म्हणून लढवण्यात आली होती. मात्र त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नव्हते. असे असतानाही आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीच्या सात आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागा निवडून आणल्या. पंचायत समितीत सभापती बसवण्यासाठी जो सहकार्य करेल त्याचा पाठिंबा घेणार, असे त्यांनी जाहीर केल्यानंतर ठाकरे गट व राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती.
मात्र काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांची भेट झाल्यानंतर ठाकरे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद उपाध्यक्षपद आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसरीकडे, भाजपने वीस वर्षांनंतर जिल्हा परिषदेत खाते उघडल्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सभापतिपद तसेच जिल्हा नियोजन समितीत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटातील काही सदस्यही सभापतिपद किंवा जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सत्तास्थापनेवरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये चुरस वाढली असून, अंतिम निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








