अहमदाबाद, दि. ०८: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत इतिहास रचला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 255 धावा करत अंतिम सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 256 धावांचे प्रचंड लक्ष्य उभे राहिले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत किवी गोलंदाजांवर तुटून पडले.
भारताची वादळी सुरुवात
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 43 चेंडूत 98 धावांची तुफानी भागीदारी करत भारतीय डावाला जबरदस्त सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत 52 धावा केल्या. त्यानंतर रचिन रवींद्रने त्याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला.
यानंतर सॅमसनला साथ देण्यासाठी इशान किशन मैदानात आला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 105 धावांची दमदार भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव वाढवला.
सॅमसनची 89 धावांची शानदार खेळी
संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकता यांचा उत्कृष्ट मेळ साधत 89 धावांची शानदार खेळी केली. इशान किशननेही 54 धावांचे अर्धशतक ठोकत भारताची धावगती कायम ठेवली. कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र खातेही न उघडता बाद झाला.
हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 18 धावा केल्या, तर शेवटच्या षटकांत शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 8 चेंडूत 28 धावा ठोकल्या आणि भारताची धावसंख्या 255 पर्यंत पोहोचवली. भारताच्या डावात 18 षटकार आणि 18 चौकार ठोकण्यात आले.
किवी गोलंदाजांची धुलाई
भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. लॉकी फर्ग्यूसनने 2 षटकांत 48 धावा दिल्या, तर रचिन रवींद्रने 2 षटकांत 32 धावा देत 1 विकेट घेतली. जेकब डफीने 3 षटकांत 42 धावा दिल्या. जेम्स नीशमने 4 षटकांत 45 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
कीवींची संथ सुरुवात
256 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात संथ झाली. पॉवरप्ले अखेर संघाने 6 षटकांत 3 बाद 52 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवी फलंदाजांवर दबाव ठेवला आहे.
भारताला इतिहास रचण्याची संधी
या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. यापूर्वी भारताने 2007 आणि 2024 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. तसेच भारताने हा सामना जिंकला तर टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद यशस्वीरित्या राखणारा पहिला संघ बनण्याचा मानही मिळवू शकतो.
भारतीय फलंदाजांच्या वादळी खेळीमुळे आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता सर्वांचे लक्ष भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे लागले आहे.








