

चिपळूण शहराच्या पर्यावरणीय वैभवात भर घालणारी कळंबस्ते येथील देवराई अंतर्गत उभारण्यात आलेली बोटॅनिकल गार्डन आता बहरायला लागली आहे. तालुक्यात प्रथमच लोकसहभागातून साकारलेल्या या देवराईचे उद्घाटन शनिवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे. या देवराईमध्ये तब्बल २७० हून अधिक विविध जातींच्या सुमारे १३०० झाडांची लागवड करण्यात आली आहे.
कोकणातील पारंपरिक देवराईंचे अस्तित्व कालानुरूप कमी होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि दुर्मीळ होत असलेल्या वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतला. पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, शाळा-महाविद्यालये तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कळंबस्ते येथील रेल्वे फाटकाजवळ साडेतीन एकर जागेत ही देवराई विकसित करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक होती. मात्र लोकसहभागातून उभारलेल्या या प्रकल्पामुळे परिसराला नवे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी शासकीय कामकाजाबरोबरच हा प्रकल्प ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून पुढे नेत समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेतले आहे.
या देवराईत देशी प्रजातींच्या २७० पेक्षा अधिक प्रकारची झाडे लावण्यात आली असून विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करता यावा यासाठी प्रत्येक झाडावर क्यूआर कोड लावण्यात आला आहे. या कोडच्या माध्यमातून संबंधित झाडाची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. तसेच सर्व झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
साडेतीन एकर परिसराला संरक्षक जाळी लावल्याने मोकाट जनावरांचा त्रास कमी झाला आहे. गार्डनमध्ये सौरऊर्जेवर आधारित प्रकाशयोजना उभारण्यात आली असून पाहणीसाठी पक्क्या पायवाटाही तयार करण्यात आल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी येथे सुमारे १३०० रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी काही रोपे नष्ट झाल्यानंतर पुन्हा त्याच जातीची रोपे रत्नागिरी, पुणे आदी ठिकाणांहून आणून लागवड करण्यात आली.
लोकसहभागातून उभारलेले हे बोटॅनिकल गार्डन आता नागरिकांसाठी खुले होणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे हे केंद्र ठरणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नागरिक, निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे आणि तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले आहे.








