चिपळूण, दि. १४ : लायन्स प्रांत ३२३४ डी–१ विभाग ५ ची विभागीय परिषद अर्थात ‘श्री संध्या लायन्स रिजन कॉन्फरन्स’ आज रविवारी (दि. १५ मार्च) सायंकाळी ५ वाजता पेढांबे येथील डी स्टार वॉटर पार्क अँड रिसॉर्ट येथे संपन्न होणार आहे. या परिषदेसाठी मल्टिपल ३२३४ चे इंटरनॅशनल डायरेक्टर पी एम जे एफ लायन राजभाई मुच्छाल उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेसाठी दापोली ते मालवणपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे वीस लायन्स क्लबचे सदस्य तसेच चार लिओ क्लबचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रांत ३२३४ डी–१ मधील रिजन ५ (कोकण विभाग) सदस्यसंख्येच्या बाबतीत संपूर्ण प्रांतात अग्रस्थानी असल्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या विभागीय परिषदेसाठी एम जे एफ लायन दिलीप कुमार जैन प्रमुख म्हणून काम पाहत असून कॉन्फरन्स चेअरमन लायन अमर शेट्ये, रिजन सेक्रेटरी लायन मिलिंद मुद्राळे आणि त्यांची टीम परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
परिषदेमध्ये रिजनमधील विविध सेवा कार्यांचा आढावा, आगळ्या-वेगळ्या सर्विस अॅक्टिव्हिटींचे आदान-प्रदान, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा गुणगौरव सोहळा, क्विझ स्पर्धा, बॅनर प्रेझेंटेशन, बेस्ट सिग्नेचर स्पर्धा तसेच विविध मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी समाजातील गरजवंतांच्या गरजा ओळखून सेवा कार्यात कोणते बदल करता येतील तसेच प्रभावी नेतृत्व कसे असावे याबाबत लायन राजभाई मुच्छाल सर्व सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे एफ लायन डॉ. विरेंद्र चिखले, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर १ एम जे एफ लायन राजेंद्रभाई शहा (कासवा), व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २ एम जे एफ लायन डॉ. किरण खोराटे, लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ भाविन जैन, माजी प्रांतपाल एम जे एफ लायन उदयजी लोध व पी एम जे एफ लायन जगदीश पुरोहित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चिपळूणमधील प्रतिष्ठित कापड व्यापारी व जयंत साडी सेंटरचे मालक, मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले एम जे एफ लायन दिलीप कुमार जैन हे रिजन प्रमुख असल्याने रिजनमधील सर्व क्लबमधून मोठ्या संख्येने सदस्य या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
लायन्स क्लब चिपळूण या होम क्लबचे सर्व सदस्य या **‘श्री संध्या रिजन कॉन्फरन्स’**च्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न करत असून कोकण रिजन ५ मधील जास्तीत जास्त लायन्स व लिओ सदस्यांनी या परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन कॉन्फरन्स चेअरमन लायन अमर शेट्ये आणि लायन्स क्लब चिपळूणचे अध्यक्ष लायन शिरीष मुळे यांनी केले आहे.








