मुंबई मराठी पत्रकार संघ ‘एआय परिषद २०२६’ : एआयकडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहा : ब्रिजेश सिंह

  मुंबई, दि. १४ : पत्रकारितेच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ कायम राहणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित **‘एआय परिषद २०२६’**चे उद्घाटन ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ब्रिजेश सिंह म्हणाले की, मानवी इतिहासात ज्ञान प्रसाराच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होत गेले. छपाई तंत्रज्ञानामुळे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले, तर दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांच्या आगमनानंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकून राहील, मात्र स्वयंचलित होऊ शकणारी अनेक कामे एआयमुळे स्वयंचलित होतील, हे वास्तव स्वीकारावे लागेल.

सध्या जगभरात काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित **‘वन-मॅन न्यूज रूम’**ची संकल्पना विकसित होत असून बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट-चेकिंग आणि पेज लेआउटसारखी अनेक कामे एआयच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा आदी क्षेत्रांतील बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारितेतील कामकाजाची पद्धत बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो,” असे सांगत त्यांनी पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांसाठी ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एआयमुळे माहिती निर्मिती, प्रसार आणि वापराची पद्धत झपाट्याने बदलत असून बातम्या अधिक गतिमान, रिअल-टाइम आणि वैयक्तिकृत होत आहेत. आजच्या “अटेन्शन इकॉनॉमी”मध्ये वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्वरूपात सामग्री सादर केली जाते. काही विदेशी वृत्तसंस्था एकाच बातमीचे विविध पर्याय तयार करून वेगवेगळ्या वाचकगटांना पाठवतात आणि त्याचा परिणाम अभ्यासतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

एआयमुळे माहितीचे प्रमाण प्रचंड वाढले असले तरी विश्वासार्हतेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. एआय प्रणाली कधी कधी चुकीची माहिती तयार करतात. ‘हॅलुसिनेशन’मुळे नसलेले संदर्भ किंवा माहिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे एआय-निर्मित सामग्रीची अंतिम जबाबदारी संपादकीय स्तरावरच राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.

एआयची आणखी एक मर्यादा म्हणजे भारतीय भाषांचे आकलन. बहुतांश मोठी लँग्वेज मॉडेल्स पाश्चात्त्य स्रोतांवर आधारित असल्याने मराठीसह भारतीय भाषांचा संदर्भ त्यांना पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि डेटा सार्वभौमत्व महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एआयमुळे “डिप फेक” तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खोटे व्हिडिओ तयार करणे सोपे झाले असले तरी खऱ्या व्हिडिओलाही ‘डिप फेक’ म्हणण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने सत्यावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित फॅक्ट-चेक प्रणाली सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, स्वागतपर भाषणात संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले की, पत्रकारितेत तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून आज एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण, लेखन, व्हॉइसओव्हर आणि एडिटिंगसारखी अनेक कामे करू शकतो. तंत्रज्ञानाची प्रगती थांबवता येणार नाही, त्यामुळे पत्रकारांनी नव्या साधनांशी जुळवून घेणे आवश्यक आहे.

कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी प्रास्ताविकात सांगितले की, एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान पत्रकारांना अशा परिषदांमधून मिळते. राज्यात एआयचा वापर वाढविण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते परिषदेतील वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.

आणखी वाचा