मुंबई, दि. २० : नाशिकमधील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्यात निर्माण झालेल्या तीव्र राजकीय व सामाजिक वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, वाढत्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्यानंतर चाकणकर यांनी तत्काळ हा निर्णय घेतला. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणीही राज्य महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
अशोक खरात याच्यावर एका ३५ वर्षीय महिलेवर गेल्या काही वर्षांत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असून, त्यातच चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद अधिकच तीव्र झाला. एका व्हिडीओमध्ये त्या खरातची पूजा करताना दिसत असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे विरोधकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यावर टीका करताना म्हटले की, “राजीनामा देताना त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असली तरी खरात प्रकरणात त्यांच्या भूमिकेबाबत कोणताही खेद व्यक्त केलेला नाही. या प्रकरणात केवळ एक व्यक्ती नव्हे, तर आणखी किती जण सहभागी होते, याची चौकशी होऊन सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे.” तसेच या प्र

करणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, राजीनामा देण्यास खूप उशीर झाला असून, आता सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणले पाहिजे.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणात सखोल चौकशी होईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. “संपूर्ण घटनाक्रम समोर आल्यानंतरच अंतिम सत्य स्पष्ट होईल,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे महायुती सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिसरा मोठा राजीनामा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तर माणिकराव कोकाटे यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा त्याग केला होता. आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी पक्षात आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असल्यामुळे हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या पदावरून राजीनामा देणे ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. तसेच चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकंदरीत, अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून या प्रकरणाची चौकशी, त्यातील संभाव्य राजकीय संबंध आणि पुढील कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातून सत्य बाहेर येणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे, हीच राज्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.








