खरात प्रकरणात ‘सॉफ्ट टार्गेट’ केल्याचा आरोप; रुपाली चाकणकरांची सविस्तर प्रतिक्रिया

पुणे, दि. २० : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असताना, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक महिला असल्यामुळे मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, “मी आणि माझ्या कुटुंबाने खरात पती-पत्नीला केवळ आध्यात्मिक गुरु म्हणून मानले होते. समाजात अनेक वेळा आपण काही व्यक्तींवर श्रद्धा ठेवतो, त्यांना गुरु मानतो. त्याच भावनेतून आम्ही त्या संस्थेशी जोडले गेलो होतो. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, याची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती.”

त्या पुढे म्हणाल्या की, शिवनिका संस्थान आणि संबंधित महादेव मंदिर ट्रस्टमध्ये त्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. या ट्रस्टमध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग होता. “मी प्रदेशाध्यक्ष असताना या ट्रस्टमध्ये काम केले. मात्र, या ट्रस्टचा कार्यकाळ ८ ऑगस्ट २०२५ रोजीच संपला आहे. त्यानंतर आमचा कोणताही संबंध राहिलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

चाकणकर यांनी व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओंबाबतही स्पष्टीकरण दिले. “सध्या सोशल मीडियावर दाखवले जाणारे फोटो-व्हिडिओ हे ५-६ वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक जण त्या ठिकाणी जात असत. त्या वेळी आम्हीही उपस्थित राहत होतो. त्या संदर्भातील पाद्यपूजा किंवा इतर विधी हे श्रद्धेच्या भावनेतून झाले होते. मात्र, त्याचा सध्याच्या प्रकरणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर आपल्यालाही मोठा धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले. “आपण ज्या व्यक्तींना ओळखतो, त्यांच्याबद्दल काही वर्षांनी वेगळीच माहिती समोर येते. अशा प्रकारचे कृत्य त्यांनी केले असेल, तर ते अत्यंत निंदनीय आहे. अशा गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

तपासाबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या की, “या प्रकरणात पूर्णपणे निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी केली आहे.”

माध्यमांमध्ये येणाऱ्या काही बातम्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “काही माध्यमांनी कोणताही ठोस पुरावा नसताना चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. एका दैनिकाने १९ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीबाबत आम्ही त्यांना स्पष्टीकरण मागितले होते. आमच्या समुपदेशकांकडून त्यांना पत्र पाठवण्यात आले होते. जर त्यांच्या कडे काही पुरावे असतील, तर ते आयोगाला द्यावेत असे सांगितले होते. मात्र, त्यांनी स्वतःच नंतर आमच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कळवले,” असे त्यांनी सांगितले.

चाकणकर यांनी पुढे सांगितले की, आयोगाकडे आलेल्या तक्रारींवर वेळेवर कारवाई करण्यात आली होती. “५ तारखेला एका मुलीचा ई-मेल आला होता. त्या तक्रारीत खरातचा कुठेही उल्लेख नव्हता. तरीदेखील आम्ही तत्काळ पोलिसांना पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. त्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घातले, हा आरोप चुकीचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“महिला असल्यामुळेच माझ्यावर जास्त आरोप केले जात आहेत. त्या व्यक्तीसोबत अनेकांचे फोटो आहेत, पण केवळ माझ्यावरच लक्ष केंद्रित केले जात आहे. हे अन्यायकारक आहे,” असा आरोप त्यांनी केला. काही राजकीय नेत्यांनी आणि व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन चुकीची माहिती पसरवल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

यापुढे अशा प्रकारच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देताना त्या म्हणाल्या, “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून संबंधितांना नोटीस पाठवणार आहोत. कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.”

दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतरही या प्रकरणातील वाद थांबलेला नाही. राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर, पुढील तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. न्यायालयीन आणि पोलिसीय चौकशीतून या प्रकरणातील सर्व बाबी उघड होतील आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा