रत्नागिरीत भव्य पत्रकार भवन साकारणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपूजन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही

रत्नागिरी, दि. २२ : मिरजोळे एमआयडीसी येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून व कुदळ मारून करण्यात आले. या पत्रकार भवनामध्ये ग्रंथालय, सुसज्ज अभ्यासिका, निवासी व्यवस्था तसेच सभागृहाची सोय असणार असून, येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएससारख्या उच्च पदांसाठी तयार करण्याचा मानस व्यक्त करत त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रांताधिकारी जीवन देसाई, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, प्रमोद कोनकर, अलिमियाँ काझी, किशोर मोरे, आनंद तापेकर, जान्हवी पाटील, उज्ज्वला पंगेरकर, राजेंद्र चव्हाण, राकेश गुडेकर, मनोज लेले, अमोल मोरे यांच्यासह अनेक पत्रकार, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, पत्रकार भवन हे केवळ पत्रकारांसाठीचे कार्यालय नसून भविष्यातील सक्षम नेतृत्व घडविणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा आहे. “पत्रकारांच्या माध्यमातूनही आयएएस, आयपीएस अधिकारी निर्माण होऊ शकतात, हा संदेश महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे आवश्यक असून त्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र अल्पावधीत लावण्याचा निर्णय घेतला होता. मराठीबरोबरच हिंदी पत्रकारितेची मुहूर्तमेढही कोकणातून रोवली गेली आहे, याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. “पत्रकारांसाठी जे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे,” असेही त्यांनी सांगितले.

सदर पत्रकार भवनासाठी सुमारे १ कोटी ३६ लाख रुपये खर्च अपेक्षित असून या इमारतीत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये अभ्यासिका, ग्रंथालय, निवासी व्यवस्था आणि सभागृहाचा समावेश असेल. पत्रकारांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येथे निवासी सुविधा मिळणार असल्याने त्यांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. हे काम एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्तमानपत्र क्षेत्रासमोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, सोशल मीडियामुळे नवीन लेखनप्रकार निर्माण झाले असले तरी पारंपरिक पत्रकारितेला आत्मपरीक्षणाची गरज आहे. या क्षेत्रात आचारसंहिता आवश्यक असून जबाबदार पत्रकारिता टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील पत्रकारितेचा अभ्यास देशपातळीवर व्हावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कार्यशाळांचे आयोजन केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रत्नागिरी शहरातील प्राईम लोकेशनवरील पत्रकार भवनाच्या जागेचा प्रश्न ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्रितपणे सोडविल्यास त्या ठिकाणीही सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन अत्याधुनिक पत्रकार भवन उभारण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. “या पत्रकार भवनाचा वापर करताना रत्नागिरीतून राज्यासाठी आदर्श निर्माण होईल, असे काम व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी केले, तर प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मांडले. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन अलिमियाँ काझी यांनी केले.

एकूणच, पत्रकार भवनाच्या माध्यमातून पत्रकार, विद्यार्थी आणि समाज यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा निर्माण होणार असून रत्नागिरीच्या पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आणखी वाचा